
मंडळी, नामांतराचा मोठा निर्णय झाल्यानंतरही महामार्गावर प्रवास करतांना आजही आपल्याला ‘औरंगाबाद’ आणि ‘अहमदनगर’ अशी जुनी नावे दिसतात ? पण आता यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचे अहिल्यानगर, उस्मानाबादचे धाराशिव अशी अधिकृत नामांतरे केली आहेत. मात्र, अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दिशादर्शक फलकांवर अजूनही जुनी नावेच असल्याचा मुद्दा समोर आला आहे.
याबाबत हिंदु जनजागृती समितीने सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर संबंधित विभागाच्या सचिवांना तातडीने कारवाईचे आदेश देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती समितीने दिली आहे.
समितीचे म्हणणे आहे की, राजपत्रात नवीन नावे मंजूर झाल्यानंतर सर्व शासकीय कागदपत्रे आणि सार्वजनिक फलकांवर तीच नावे वापरणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे.
जुनी नावे कायम ठेवणे म्हणजे शासनाच्या निर्णयाचे पालन न करणे आणि प्रवाशांची दिशाभूल होणे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग, NHAI आणि MSRDC हे सर्व फलक अद्ययावत करण्यासाठी परिपत्रक काढतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.





