Explained : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातानंतर मृत्यू झाला. त्यानंतर आता त्यांच्या वारसदार म्हणून पत्नी सुनेत्रा पवार पुढं आल्या आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रं स्वीकारली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच त्यांच्याकडं जाईल. अजितदादा ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये जनता दरबार घेत, त्याच पदधतीनं आता सुनेत्रा पवार घेऊ लागल्या आहेत. पतीच्या मृत्यूचं दुःख विसरून त्या कामाला लागल्या आहेत. तर दुसरीकडं अजितदादा हयात असताना सुरू झालेली दोन्ही काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा आता दोन्ही बाजूंनी थांबताना दिसतेय.
आता अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार पक्षाला पुढं कसं घेऊन जातात? अजितदादांचा वारसा त्या पुढं कशा चालवितात? अजितदादांच्या हक्काच्या जिल्ह्यात, त्यांचा वचक असलेल्या जिल्ह्यात पवार किती लक्ष घालतात ?आणि त्यात त्यांना किती यश येतं? याकडं आता लक्ष लागलं आहे. त्यातच आपला अहिल्यानगर जिल्हा येतो. आता अजितदादांच्या मागं या जिल्ह्याच्या राजकारणात काय काय होऊ शततं याची चर्चा आता सुरू झालीय.
मंडळी राजकारण कधी कुणासाठी थांबत नसतं. नेत्याचा मृत्यू झाला, तरी ठराविक दिवस दुःख व्यक्त करून ते पुढं चालू होतं. तसंच अजितदादांच्या मृत्यूनंतर झालंय. राजकारण आता पुढं गेलंय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा आता थांबली आहे. त्यामुळं दोन्ही पक्षांना आपापला पक्ष चालवायचा आहे. पक्ष चालविताना गरज पडली तर एकमेकांच्या विरोधातही लढावं लागतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत खुद्द सुनेत्रा पवार यांचा सामना नणंद सुप्रिया सुळे यांच्याशी झाला होता. त्यामुळं भविष्यातही असे सामने होणार नाहीत, याची खात्री देता येत नाही.
जे काही राजकारण सुरूय आणि भविष्यात होऊ घातलंय, त्यात अहिल्यानगरवर काय परिणाम होऊ शकतो, याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्याला कारणही तसंच आहे. अहिल्यानगर जिल्हा हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बाल्लेकिल्ला मानला जात होता. त्यांचं जिल्ह्यात बारकाईनं लक्ष असायचं. त्यांना येथून वेळोवेळी तशी साथही मिळालीय. मात्र, जेव्हा पक्ष फुटला, तेव्हा हा वारसा अजितदादांकडं गेल्याचं पहायला मिळालं. अर्थात हे सहजासहजी झालं नाही.
लोकसभा निवडणुकीत अजितदादांचा प्रभाव जाणवला नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत अजितदादा स्वतः मध्ये आणि पक्षामध्येही बदल करून आले. तो बदल अहिल्यानगरकरारांनी स्वीकारलाा. त्यातूनच जिल्ह्यात शरद पवारांच्या राजकारणाची जागा अजितदादांनी घेतलेली पाहायला मिळाली. पारनेर, नगर शहर, अकोले, कोपरगाव येथील जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या. श्रीरामापूरची जागा उमेदवाराची घोळात गमवावी लागली. एकूणच बदलत्या अजितदादांना अहिल्यानगरनं स्वीकारलं, त्यामुळंच ते आपले काका शरद पवार यांचा किल्ला काबीज करू शकले.
आता हे राजकारण सुनेत्रा पवार यांना पुढं न्यायचं आहे. अजितदादा यांना हे सहजासहजी शक्य झालेलं नाही. मुळात अजितदादा आले, ते काका शरद पवार यांच्या पक्षात फूट पाडून. सुरवातीला जिल्ह्यातील पवारांचे कार्यकर्ते आणि मतदारांना दादांचे हे वागणं रुचलेलं नव्हतं. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, अजितदादा यांनी खचून न जाता संपर्क सुरू ठेवला. मिळालेली सत्ता आणि अर्थ खातं याचा पुरेपूर वापर करून अधिकाधिक निधी आपल्यासोबत असलेल्या शिलेदारांमार्फत उपलब्ध करून दिला. त्यातून मतदारांची मनं जिंकण्यात त्यांच्या शिलेदारांना यश आलं. हे आपण विधानसभा निवडणुकीत पाहिलं आहे.
आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दूर आहेत. तोपर्यंत राजकारणात आणखी काय काय घडेल, हे आताच सांगणं कठीण. मात्र जिल्हा परिषद आणि अनेक सहकारी संस्था तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुका मात्र लवकरच होणार आहेत. यात आता सुनेत्रा पवार यांची परीक्षा होणार आहे. अजितदादा यांचा मृत्यू झाला, त्या काळात पुण्यासह बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुरू होत्या. एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर आलेल्या निवडणुकीत सहानुभूतीची लाट असते. तशी लाट अजितदादांच्या बाबतीतही गृहित धरली होती. मात्र पुणे आणि कोल्हापूर वगळात इतरत्र याचा फरसा प्रभाव दिसला नाही.
आता उरलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील. त्यात अहिल्यानगरचाही समावेश आहे. अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. पक्ष फुटीनंतर होणारी ही झेडपीची पहिलीच निवडणूक आहे. राज्यात अनेक ठिकाणी आता भाजपने झेडपीची सत्ता काबिज केली आहे. अहिल्यानगर झेडपी भाजपला कधीच जिंकता आलेली नाही.
त्यामुळं इथं भाजप नक्कीच जोर लावणार, हे नक्की. ग्रामीण राजकारणाचा कणा असलेल्या झेडपीत राजकारणही वेगळंच असतं. याची पुरेपूर जाणीव अजितदादांना होती. त्यामुळं कोणा पदाधिकाऱयाला कसं हात़ळायचं, कोणी जास्त बोलत असेल तर त्याला गप्प कसं करायचं. कोणाला मोठं करायचं, कोणाला पद्धतशीर बाजूला करायचं याचं गणित अजितदादांना पक्कं ठावूक होतं. मतदारांशी संपर्काचीही त्यांची वेगळी स्टाईल होती. अजितदादांची जी भाषणं गाजली, त्यातील बहुतांश ग्रामीण भागातील आणि ग्रामीण ढंगातील आहेत.
अजितदादांची ही वैशिष्टय सांगण्याचे कारण म्हणजे, त्यांनी पक्ष अशा पद्धतीने वाढविला होता. त्यांची ही स्टाईल लोकांना भावली होती. चूक ते चूक, बरोबर ते बरोबर, असा त्यांचा स्पषवक्तपणा होता. पक्षाच्या धोरणाविरोधात कोणी वागत असले, तर कितीही जवळचा असला तरी त्याला झापण्याचं धाडस अजितदादा ठेवून होते. त्यामुळं कोणी चुकत असेल तर लोक थेट अजितदादांना भेटून तक्रार करीत होते. आता ही जागा सुनेत्रा पवार कशी भरून काढणार, हा प्रश्न आहे. अजितदादांचा विचार, त्यांची कामाच्या पद्धतीचा काही भाग सुनेत्रा पवार यांनी स्वीकारल्याचं दिसतं.
मात्र, कार्यकर्त्यांना थेट ओळखणे, जवळ करणं, प्रसंगी झापणं वगैरे गोष्टी त्यांना कशा साध्य होतील? जिल्ह्यात आल्यावर त्या कोणाला जवळ करणार? कोणाला दूर ठेवणार? यावरही बरेच गणित अवलंबलून आहे. मुख्य म्हणजे कानाला लागून, गाडीत बसून पुढं पुढं करणारे, जनतेत फारसे स्थान नसताना नेत्यांपुढं मिरविणारे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या जिल्ह्यात आहेत.
ते सगळ्याच पक्षांत आहेत. त्यांना ओळखण्याचं गणित अजितदादांना साध्य झालं होतं. कारण त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव होता. आता हे गणित सुनेत्रा पवार यांना शिकून घ्यावं लागणार आहे. ते शिकविण्यासाठी दादा तर नाहीत. त्यामुळं त्यांचं त्यांनाच ते सोडवावं लागणार आहे. या निमित्तानंही कुणी तरी पुढं येऊन सोयीचे सल्ले देणारे तयार होत असतात. याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालंच नाही तर अशाच परिस्थिती पुढील निवडणुकांना सामोरं जाण्याची वेळ येऊ शकते. तेव्हा त्यांचा सामना कुटुंबातील सदस्यांसोबत पुन्हा होऊ शकतो. अहिल्यानगर जिल्ह्यातही आमदार रोहित पवार यांच्याशी त्यांचा सामना होऊ शकतो. मागील विधानसभा निवडणुकीत आमदार पवार यांना अजितदादांनी अप्रत्यक्ष मदत केल्याचं नंतर पुढं आलं होतं.
पक्षफुटीनंतर कुटुंबात कटूता असलेला तो काळ होता. आता मात्र, कुटुंबातील कटुता कमी झालेली आहे. अशा काळात युतीतील मित्र पक्षाचा उमेदवार आणि कुटुंबातील सदस्य यांचा योग्य मेळ घालण्याची वेळही सुनेत्रा पवार यांच्यावर येऊ शकते. त्यावेळीही त्यांची कसोटी लागणार आहे. दुसरीकडं शरद पवार यांच्याकडून पक्ष घेतल्यानंतर अजितदादांनी जी आपली ताकद जिल्ह्यात निर्माण केली ती टिकविणं, वाढविण्याचं कामही सुनेत्रा पवार यांना करावं लागणार आहे.
राजकारण हे घरात बसून करण्याची गोष्ट नाही. अधून मधून करण्याचाही तो व्यवसाय नाही. सतत लोकांमध्ये रहावं लागतं. सतत फिरावं लागतं. टीकाही सहन करावी लागते. हे सगळं आता सुनेत्रा पवारांना करावं लागणार आहे. अजितदादा ज्या सातत्याने अहिल्यानगच्या संपर्कात होते, तसा त्यांना ठेवावा लागणार आहे.अहिल्यानगरसारख्या राजकीय दृष्ट्या जागरूरक असलेल्या जिल्ह्यात त्यांची अधिकच कसोटी लागणार एवढा मात्र फरक आहे. आता झेडपीच्या निमित्तानं घोडामैदान जवळ आलं आहे. त्यात स्वतः सिद्ध करण्याची आणि अजितदादांच्या खऱया वारसदार असल्याचं दाखवून दे्ण्याची संधी पवार यांना आहे. त्याचं ते कसं सोनं करतात हे लवकरच स्पष्ट होईल.





