Latest

पाणलोटात मुसळधार ! धरणसाठ्यांत ‘इतकी’ वाढ, धबधबेही कोसळू लागले.

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने वाढू लागली आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून आता छोटे-मोठे धबधबेही कोसळू लागल्याने निसर्ग पुन्हा एकदा बहरला आहे.

मंडळी, भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी आणि पांजरे परिसरात गेल्या तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरू आहे. त्यामुळे भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक वाढली असून, धरणातील पाणीसाठा तीन हजार दलघफूंच्या पुढे गेला आहे.

कळसुबाई परिसरातही पावसाचे सातत्य कायम आहे. त्यामुळे प्रवरेची उपनदी असलेली कृष्णवंती नदी प्रवाही झाली आहे. तसेच वाकी येथील लघुपाटबंधारे तलावातही नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. हा तलाव भरल्यानंतर निळवंडे धरणातही पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सध्या भंडारदरा धरणात सुमारे २७ टक्के, निळवंडे धरणात १८ टक्के, मुळा धरणात जवळपास २५ टक्के, तर आढळा धरणात ३४ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. एकंदरीत, धरणांमध्ये वाढणारा पाणीसाठा ही शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी दिलासादायक बाब असली, तरी पुढील काही दिवस हवामानाचा इशारा लक्षात घेऊन सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button