
पहिली मुलगी असलेल्या गर्भवती महिलांवर आता शासनाची विशेष नजर असणार आहे. होय.. राज्य शासनाने गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, अशा गर्भवती महिलांचे प्रसूतीपर्यंत विशेष ट्रॅकिंग केले जाणार आहे.
मंडळी, ज्या महिलांना पहिली मुलगी किंवा त्यापेक्षा जास्त मुली आहेत, अशा गर्भवतींची आता आरोग्य विभागाकडून विशेष नोंद ठेवली जात आहे.
या मोहिमेअंतर्गत महिलेला आधी किती अपत्ये आहेत, त्यामध्ये मुलगा किंवा मुलगी किती आहेत, याची स्वतंत्र नोंद केली जात आहे. ही माहिती शासनाच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदवून डिजिटल पद्धतीने संकलित केली जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, ही पाळत महिलांवर संशय घेण्यासाठी नाही, तर बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आहे. काही ठिकाणी दुसऱ्यांदा मुलगी होऊ नये म्हणून बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या घटना समोर येत असल्याने शासनाने हे पाऊल उचलले आहे.
यामध्ये संबंधित गर्भवती महिलेचे प्रसूतीपर्यंत नियमित ट्रॅकिंग आणि फॉलोअप केला जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, सोनोग्राफी आणि इतर वैद्यकीय बाबींवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. मंडळी, या निर्णयाबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.





