Latest

जामखेडची लेक करणार भारताचे नेतृत्व ! १५ वर्षीय धारा बीडकरची तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड, UAE मध्ये खेळणार

वय अवघं १५ वर्ष… आणि आता थेट यूएईमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व ! जामखेड तालुक्यातील या लेकीने प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली आहे.

मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावची धारा बीडकर हिची संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱ्या सब ज्युनिअर आशियाई युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

धारा ही मूळ खर्डा येथील असून तिचे वडील डॉ. अमोल बीडकर सध्या पुण्यात वैद्यकीय व्यवसाय करतात. अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही तिच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण जामखेड तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.

तिरंदाजीसारख्या कठीण आणि कौशल्यपूर्ण खेळात धाराने सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर तिने भारतीय संघात स्थान मिळवले.

धाराच्या या यशामुळे खर्डा गावात आनंदाचे वातावरण असून तिच्या कुटुंबीयांवर आणि संपूर्ण जिल्ह्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. धारा बीडकरला आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी अहिल्यानगर लाईव्ह 24 कडून मनःपूर्वक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button