
पावसाळ्यातील एक निष्काळजीपणा किती जीवघेणा ठरू शकतो, याची हृदयद्रावक घटना अहिल्यानगर जिल्ह्यात समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या १२ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सुरेगावगंगा येथे ही दुर्दैवी घटना घडली. श्रवण प्रवीण गायकवाड हा १२ वर्षीय विद्यार्थी शाळेतून घरी येत होता. पावसामुळे विजेच्या खांबात वीजप्रवाह उतरल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो जागीच बेशुद्ध पडला.
घटनास्थळी असलेल्या नातेवाईकांनी तत्काळ त्याला खासगी वाहनाने नेवासा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पावसाळ्यात ओले झालेले विजेचे खांब, तुटलेल्या तारा किंवा विद्युत उपकरणांच्या संपर्कात जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः पालकांनी मुलांना अशा ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला द्यावा. थोडीशी सावधगिरी अनेकांचे प्राण वाचवू शकते.





