Explained : गेल्या दोन महिन्यांत दोन महिला पोलिसांना स्वतःवरील अन्यायाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली. अहिल्यानगर जिल्ह्यात महिला पोलिसच असुरक्षित असल्याचं या प्रकारानंतर उघड झालंय. आता नगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला ब्लँकमेल करत तब्बल सात वर्षे तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलंय. ही महिला पोलिसाने, तोफखाना पोलिसांसमोर जेव्हा आपली कैफियत मांडली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. अहिल्यानगर तालुका पोलिस आता या अत्याचाराच्या आरोपांची चौकशी करत आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण, हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत…
महिला दिनी नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली. 8 मार्चला जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या एका महिला पोलिसाने तोफखाना पोलिसांत एका तरुणाविरोधात तक्रार दिली. रणजित मुकिंदा चव्हाण (रा. निमजेवाडी, घोटवी, ता. श्रीगोंदा) असे संशयीत आरोपी तरुणाचे नाव आहे. रणजित याने आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्न करण्याचे आमिष दाखवले व त्यानंतर मार्च 2019 ते 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला, अशी फिर्याद या महिला पोलिसाने दिली. रणजित चव्हाण व महिला पोलिसाची ओळख होती. त्यातून या दोघांमध्ये प्रेम जडले.
रणजितच्या भुलथापांना ही महिला पोलिस बळी पडली. रणजितने तिचा विश्वास संपादन केला. लग्न करण्याचे वचन दिले. मार्च 2019 पासून रणजित व या महिला पोलिसाची जवळीक वाढल्यानंतर रणजितने या महिला पोलिसाला अहिल्यानगर-दौंड रस्त्यावरील बाबुर्डी बेंद येथील एका हाँटेलवर नेले. रणजितवर विश्वास असल्याने व त्याने लग्नाचे वचन दिल्याने या महिला पोलिसाने रणजितने जे सांगितले ते केले. पण त्याच काळात जास्त विश्वास ठेवल्याने ही महिला पोलिस रणजितच्या जाळ्यात अडकली. रणजितने या महिला पोलिसाचे गुपचूप फोटो व व्हिडीओ शूट केले. त्यात काही खासगी क्षणांचेही होते. हेच फोटो व व्हिडीओ नातेवाईकांना दाखविण्याची धमकी रणजितने या महिला पोलिसाला दिली.
नोकरीला असल्याने बदनामी नको म्हणून या महिला पोलिसाने सुरुवातीला रणजितच्या धमक्यांना घाबरत तो सांगेल तसे केले. ब्लँकमेल करुन रणजितने या महिला पोलिसासोबत वारंवार शारिरीक संबंध प्रस्तापित केले, असे या महिला पोलिसाने तोफखाना पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. मात्र, सदरची घटना अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असल्याने तपासकामी तो गुन्हा अहिल्यानगर तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
यापूर्वी जानेवारी महिन्यात पोलिस अधिक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिसानेही एक गंभीर फिर्याद दिली होती. एका पोलीस कर्मचाऱ्यानं पदाचा गैरवापर करत थेट संबंधाचा प्रस्ताव दिल्याचा, तर एका खासगी व्यक्तीनं कार्यालय परिसरातच अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप या पोलीस महिलेनं केला होता. या प्रकरणी त्यावेळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दीपक सरोदे आणि भाऊसाहेब शिंदे असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीची नावं आहेत. यातील दीपक सरोदे हा पोलीस शिपाई आहे. महिला पोलिसाने दिलेल्या तक्रारीनंतर दीपक सरोदे या पोलिस कर्मचाऱ्याची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली होती. शिवाय त्याच्याकडे असलेले स्टेनोचे कामही काढून घेण्यात आले होते. आता पुन्हा एखादा एका महिला पोलिसाने अत्याचार झाल्याची तक्रार दिल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.महिला पोलिस कर्मचारीच सुरक्षित नसतील तर सामान्यांनी सुरक्षेची काय अपेक्षा ठेवावी, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.





