Explained

Explained : जिल्हा सुतासारखा सरळ होईल का? कृष्णप्रकाश यांनी घेतली पोलिसांची परिक्षा

आयर्नमॅन म्हणून परिचित असणारे राज्याचे अपर पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी नुकतीच अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलाची वार्षिक तपासणी केली. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांनी वृंद परिषदेच्या माध्यमातून पोलिस व अधिकाऱ्यांच्या तक्रारी ऐकूण घेतल्या. याच परिषदेत पोलिसांनी सुचविलेल्या बदलावर कृष्णप्रकाश यांनी सकारात्मक तोडगा काढत काही बदल केले. कृष्णप्रकाश यांचे हेच बदल नगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घातलील, अशा शक्यता आता व्यक्त केल्या जात आहेत. नेमकं काय झालं या परिषदेत? कोणत्या प्रश्नांवर चर्चा झाली? नगर पोलिस दलात काय बदल होतील?

पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर अपर पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी जिल्हा पोलिस दलाची वार्षिक तपासणी केली. पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधिक्षक वैभव कलबुर्गे, सोमनाथ वाकचौरे यांच्यासह जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दैनंदिन कामात येणाऱ्या अडचणी या कर्मचाऱ्यांनी मांडल्या. याच अडचणींवर तत्काळ तोडगा काढण्यात आला. आता ही तत्परता कृष्णप्रकाश यांनी दाखविल्यामुळे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी आळा बसेल, अशा शक्यता वर्तविण्यात आल्या. नेमके कोणते महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर आले व त्यावर काय तोडगा निघाला, हे पहिल्यांदा पाहू…

शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरु यांनी राज्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपींचे मोंडस ऑपरेंडी एकत्रित केलेली नसल्याचे निदर्षणास आणून दिले. घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा एकत्रित डाटा नसल्याने तपासात अडचणी येतात, असं त्यांनी निदर्षणास आणून दिलं. त्यावर तत्काळ पत्रव्यवहार करुन ही समस्या सोडविण्याचे आश्वासन कृष्णप्रकाश यांनी दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेसाठी मोबाईल कंपन्यांचा डाटा रिकव्हर करण्याचे स्वतंत्र लायसन्स देण्याची मागणी केली. सायबर पोलिस ठाण्यामध्ये विविध मोबााईल कंपन्यांचा डेटा रिकव्हर करण्याचे लायसन्सची मुदत संपल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. स्थानिक गुन्हे शाखेलाही हा डाटा रिकव्हर करण्याचे लायसन्स देण्यासाठी तत्काळ पत्रव्यवहार केला जाईल, अशी ग्वाही कृष्णप्रकाश यांनी दिली.

पोलिस बढतीची समस्याही यावेळी पुढे आली. एका महिला कर्मचाऱ्याने 2012 साली भरती झालेल्यांना बढती मिळाली, मात्र 2010 मध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची बढती झाली नसल्याची बाब अधोरेखित केली. त्यावर तोडगा काढताना, 2012 मधील शासन निर्णयाची अडचण समोर आली. 2010 मध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन कृष्णप्रकाश यांनी दिले.

पोलिस खेळाडूंबाबतचे काही प्रश्नही यावेळी पुढे आले. पोलिस दलातील बाँक्सिंग खेळाडूंना राज्य बाँक्सिंग असोशिएशनकडून विविध स्पर्धांमध्ये खेळण्यास मान्यता दिली जात नसल्याचे यावेळी समोर आले. यावर कृष्णप्रकाश यांनी बाँक्सिंग असोशिएशनचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांना फोन लावला. आ. दरेकर यांनी यावर तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला.

नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी ग्रामसुरक्षा दलाच्या बंद निधीबाबत प्रश्न मांडला. निधी बंद झाल्याने अनेक गावातील ग्रामसुरक्षा पथके बंद पडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर कृष्णप्रकाश यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्याच्या सुचना केल्या.

ड्रग्ज प्रकरण, आर्थिक घोटाळे, सायबर क्राइम, गुंडगिरी, धार्मिक वाद या सगळ्याच मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. कृष्णप्रकाश हे पूर्वी काही वर्षे नगरमध्येही होते. त्यावेळी लाँटरीचालक अशोक लांडे खून प्रकरण चांगलेच गाजले होते. त्या प्रकरणानंतर कृष्णप्रकाश चांगलेच चर्चेत आले होते. नगर जिल्ह्याची सगळी माहिती त्यांच्याकडे असल्याने आता नगर पोलिसांचे प्रश्न तत्काळ मार्गी लागतील, अशा शक्यता वाढल्या आहेत. कृष्णप्रकाश यांच्या काळातच जिल्ह्यातील दूध भेसळ, वैद्यकीय व इतर घोटाळे उघड झाले होते. गुन्हेगारांना त्यांना सुतासारखे सरळ केले होते. अगदी नेत्यांवरही त्यांचा वचक होता. नगर जिल्ह्यातील आर्थिक, राजकीय माहिती असल्याने नगर जिल्हा पोलिस दलातील प्रश्न सुटतील व जिल्हा पुन्हा सरळ होईल, अशा शक्यता यामुळे वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button