अहिल्यानगर सायबर पोलिसांनी, शनैश्वर देवस्थानमधील अॅप घोटाळ्याबाबत सोमवारी नेवासा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. थोड-थिडकं नाही, तर हे तब्बल अडीच हजार पानांचं होतं. परंतु ज्या 500 कोटींच्या घोटाळ्याची चर्चा होती किंवा आहे, तो घोटाळा या आरोपपत्रात फक्त 77 लाखांपर्यंतच सापडलाय. फक्त 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. खोदा पहाड निकला चुहा, असा हा तपास झालाय. अॅपमधील व्हिडीओत दिसणाऱ्या किंवा कोटींची संपत्ती डोळ्यांसमोर असणाऱ्या पुजाऱ्यांना, या प्रकरणातून कुणी सहिसलामत सोडवलंय का? हा प्रश्न यानिमित्ताने समोर आलाय. हे सगळं ठरवून होतंय का? पाठशिवणीचा खेळ कोण खेळतंय? हेच आपण या व्हिडीओतून समजून घेणार आहोत…
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नेवाशाचे आ. विठ्ठल लंघे व आष्टीचे आ. सुरेश धस यांनी शनैश्वर देवस्थानमध्ये झालेला अॅप घोटाळा बाहेर काढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्याची गंभीर दखल घेतली होती. धर्मादाय आयुक्त, सायबर पोलिस व स्वतंत्र गुन्हे शाखेमार्फत हा तपास करण्याचे आश्वासन दिले होते. हा सगळा तपास मुंबईतून करण्यात येणार असल्याचे बोलले गेले परंतु प्रत्यक्षात नगरच्या पोलिसांकडेच ही जबाबदारी दिल्याचे दिसले.
सुरुवातीला कुणीच तक्रारदार पुढे न आल्याने, पोलिस स्वतः फिर्यादी झाले. सायबर पोलिसांनी देवस्थानचे विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी, अॅप मालक आणि पुजाऱ्यांचे जबाब नोंदवले. विविध बँक खाती व पुरावे तपासले. त्यानंतर आता नेवासा न्यायालयात नऊ संशयितांविरोधात अडीच हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले. आरोप 500 कोटींचा असला तरी, या प्रकरणात फक्त 77 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप त्यात केला गेला. नऊ संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आता हे नऊ संशयीत कोण? ते पहा…
पूर्वीच अटकेत असलेला कर्मचारी संजय तुळशीराम पवार (रा. सोनई),
दुसरा कर्मचारी सचिन अशोक शेटे (रा. शनिशिंगणापूर)
नितीन सुर्यभान शेटे (मयत),
उज्वल निरंज भट्टाचार्य (पश्चिम बंगाल),
वरूण दत्तात्रय पाठक (रा. बनपिंप्री, ता. श्रीगोंदा),
विभू जयप्रकाश अग्रवाल (रा. लखनऊ),
शालिनी भारत जैयस्वाल (रा. मुंबई),
सचिन रावसाहेब बनकर (रा. शनिशिंगणापूर),
गोरक्ष केरूजी दरंदले (रा. सोनई)
खरंतर या घोटाळ्याच्या तपासावर पहिल्यापासून संशय व्यक्त केला जात होता. मोठ्या फसवणूक करणाऱ्यांना वाचवून फक्त काहींनाच बळीचा बकरा केलं जात असल्याचे बोललं जात होतं. डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात आ. विठ्ठल लंघे यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जावा, अशी मागणी केली होती. परंतु त्यापैकी काहीच झालं नाही. सायबर क्राईमच्या उच्चस्तरिय तपास यंत्रणेकडून हा तपास करण्याचे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं होते. ते आश्वासनही सरकारनं पाळलं नाही. हा तपास प्रत्यक्षात अहिल्यानगर सायबर स्थरावरुनच झाला. एकीकडे नगर पोलिसांचे वेगवेगळे कारनामे बाहेर येत असतानाच, त्यांच्याकडून दाखल झालेले दोषारोपपत्र शनिभक्तांना कसे मान्य होईल, हाही आता प्रश्न आहे.
आ. विठ्ठल लंघे यांनी या तपासावर असमाधान व्यक्त केले होते आणि आजही करताहेत. शनिभक्तही असमाधानी आहेत. सायबर पोलिसांनी फक्त 77 लाखांचा अपहार झाल्याचे दोषारोपपत्रात नमूद केलंय. या सगळ्या प्रकरणाबाबत सगळ्यात जास्त चर्चा होतेय, ती स्थानिक पुजाऱ्यांची… पुजाऱ्यांची एक टीम आहे, या पुजाऱ्यांच्या दुसऱ्या पिढीतील काही स्मार्ट पोरांनी व जावयानी या घोटाळ्यात मोठा मलिदा खाल्ल्याच्या चर्चा आहेत. पुजारी टोळीच्या दुसऱ्या पिढीतील तुरुणांची लाईफस्टाईलही बोलकी आहे. वर्षाला या पुजाऱ्यांची पोरं कोट्यवधी रुपये उडवतात. या पोरांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर त्यांची उच्चभ्रू लाईफस्टाईल डोळ्यांनी दिसतेय.
लाखोंच्या गाड्या, बंगले, जमीनी, हे सगळं या पुजाऱ्यांच्या पोरांकडं आहे. परंतु तरीही यापैकी कुणीही या दोषारोपपत्रात आलेलं नाही. बरं, हे पुजारी सोनई व परिसरातील आहेत. अगदी 10-15 वर्षापूर्वी अगदी सामान्य आयुष्य जगणारे हे पुजारी थोड्या कालावधीत एवढे गब्बर कसे झाले? हे कोडंच आहे. बनावट अॅप घोटाळा, बनावट क्यू-आर कोड, या आरोपांत पुजाऱ्यांची ही नवी टोळी नक्कीच सहभागी असल्याच्या चर्चा अजूनही होताहेत. परंतु सायबर पोलिस, नगर पोलिस यांना त्यांच्या विरोधात काहीच सापडू नये? हे सगळं धक्कादायक आहे.
या प्रकरणाच्या तपासात जास्त दिवस गेले. तेवढ्या काळात अनेक पुरावे मिटविण्यात आले. देवस्थानच्या काही अधिकाऱ्यांनी व अॅप चालकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव केली. सगळ्या प्रकारांवर पांघरून घालणारे फेरबदल झाले, असे सगळे आरोप आता होताहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी कायदेशीर नसणारी अनेक प्रकारची लूटमार, हळूहळू देवस्थानच्या लेखी कायदेशीर करण्यात आली का? हाही प्रश्न आहे. यातील एक ज्येष्ठ पुजारी गेल्या कित्येक वर्षांपासून देवस्थानमध्ये आहे. मुख्य पुजारी म्हणून, त्याने देश-विदेशात ओळखी बनविल्या आहेत. थेट मुख्यमंत्री व इतर अनेक मोठ्या नेत्यांसोबत, त्याची थेट ओळख असल्याच्या चर्चा आहेत. मग हे सगळं वर पासूनच मिटवलं गेलंय का? अशाही चर्चा आता सुरु झाल्या आहेत.
शनिभक्तांच्या भावनांचा विचार करुन, सरकारने हा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. त्यासाठी मोठं आंदोलन करण्याची तयारी काही सामाजिक कार्यकर्ते व शनिभक्त करत असल्याच्या चर्चा आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्यापर्यंत जाण्याची तयारीही काही शनिभक्तानी केल्याचे बोलले जात आहे. हिंदूत्ववादी सरकार म्हणविणाऱ्या भाजपनेच आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून हे प्रकरण बाहेर काढावं, अशी मागणी आता होत आहे. अन्यथा सरकारवरील सामान्य शनिभक्तांचा विश्वास उडेल, हे मात्र नक्की…





