सोशल मीडियावर हवा करणारे, अगदी रानातल्या काँग्रेसप्रमाणे झपाट्यानं वाढताहेत. आपल्या नगरमध्येही सोशल मीडियात हवा करणारे, कमी नाहीत. कुणाला वाकड्या-तिकड्या डान्सचा नाद असतो, कुणाला पांचट विनोदाचा नाद असतो, तर कुणाला लाईक, शअर्सचं थेट व्यसन लागलेलं असतं… भाईगिरी, दादागिरी आणि डाँनगिरी, करणारेही अगदी फुटा-फुटांवर दिसतात… अशाच एका गल्लीबोळातल्या भाईला, गुरुवारी संगमनेर पोलिसांनी धो-धो धुतलं… तुफान पिसून काढलंय… कोयता हातात घेऊन दहशत करणारा हा सोशल मीडियावरील ‘भाई’, आता लाईक्ससाठी नाही, तर थेट जामीन मिळविण्यासाठी धडपडतोय… संगमनेर पोलिसांनी, ‘कायद्याचा किल्ला अहिल्यानगर जिल्हा’ असं त्याच्या तोंडून वदवून घेतल्याचं सांगितलं जातंय.
जे संगमनेर पोलिसांना जमलंय, तेच आता नगर शहर, पाथर्डी, श्रीरामपूर, इथल्या पोलिसांनी करावं, अशी सामान्यांची अपेक्षा आहे. नेमका काय आहे या कोयता भाईचा किस्सा..? त्याची हवा पोलिसांनी कशी काढून घेतलीय..? हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत…
मंडळी, तुमच्या-आमच्यापैकी सोशल मीडिया अनेकजण वापरतात. इन्स्टा, रिल्स किंवा अन्य कोणत्याही प्लॅटफाँर्मला जा, तिथं रिल्स बनविणारे चिक्कार कलाकार दिसतात. नको-नको ते प्रयोग करुन, सबस्क्रायबर्स आणि फाँलोअर्स वाढविणारे ढिगा-ढिगाने दिसतात. कोरोना काळात सगळे घरीच होते. बसल्या जागी काही काम नव्हतं, तेव्हा हे पीक जोमानं वाढलं. ज्याला येतंय त्याने केल्यावर, ज्याला एडिटींगचा ए ही कळत नाही, तोही सोशल मीडियावर रिल्स अपलोड करु लागला. नको-नको त्या पद्धतीने फेसम होण्याचा प्रयत्न करु लागला. याच काळात, भाईगिरी करणाऱ्याचं पिकही जोमात वाढलं.
सोशल मीडियाचा आणि त्यातल्या त्यात रिल्सचा वापर, चांगलं दाखविण्यापेक्षा वाईट दाखविण्याकडं जास्त वळाला. गल्लीतले छोटे मोठे भाईही, त्याच काळात फार्ममध्ये आले. त्यात अल्लू अर्जूनच्या पुष्पा आणि यशच्या केजीएफने या गल्लीबोळातल्या भाईंच्या अंगावर जास्त मास चढवलं. जो तो या कॅरेक्टर्सच्या नादात स्वतःला भाई म्हणून प्रमोट करु लागला. दोन-चार गल्लीतले टोळबहिरे सोबत घ्यायचे आणि दुचाकी किंवा चारचाकीवर रिल्स बनवायची, अशी जणू चढाओढच लागली. आपल्या शेजारच्या बीड जिल्ह्यात, तर पिस्तूल हातात घेऊन किंवा अगदी हवेत गोळीबार करुन रिल्स बनविण्याचा अनेकांचा धंदाच झाला होता.
अर्थात काही प्रमाणात बीड पोलिसांनी व त्यानंतर नाशिक जिल्हा पोलिसांनी या भाईंचा चुन-चुन के बदला घेतला. कुणाला थेट लाँकअपमध्ये टाकून तर कुणाची गल्लीबोळात धिंड काढून त्यांच्या भाईगिरीची हवाच पोलिसांनी काढून टाकली. पुणे जिल्ह्या पोलिसांनीही, या भाई, दादांवर चांगलाच धाक बसवला. त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यात या भाई, दादांच्या पीकाची सोंगणी पोलिसांनी केली नव्हती. श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदार या संशयीत अतिरेक्याच्या मृत्यूनंतर आतंकवादाला धमकीवजा खतपाणी घालणारे, अनेक मॅसेजेच, रिल्स व व्हिडीओज सोशल मीडियावर फिरले. परंतु पोलिसांनी ते तेवढे सिरिअस घेतले नाहीत. आता अहिल्यानगर पोलिस, टप्प्याटप्याने या भाई-दादांना रिंगणात घेताना दिसताहेत.
त्याचा श्रीगणेशा संगमनेरमधून झालाय. संगमनेरमध्ये चंद्रशेखर चौकात 30 नोव्हेंबरला दुचाकीवर कोयता घेऊन दहशत करणाऱ्या व या दहशतीचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकणाऱ्या, फारुक इसाक शेख रा. संगमनेर खुर्द या भाईला चांगलाच हिसका दाखवला. पोलिस उपनिरिक्षक श्रीकांत सावंत यांना बुधवारी सोशल मीडियावर फारुकचा एक व्हिडीओ दिसला. त्यात फारुक एका हातात कोयता व दुसऱ्या हाताने दुचाकी चालवताना दिसला. इतर टोळ-बहिरेही कदाचित त्या रिल्समध्ये होते. हीच रिल्स या फारुकने दहशत पससविण्यासाठी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटला अपलोड केली होती.
या रिल्सची तांत्रिक चौकशी केली असता, ती रिल्स चंद्रशेखर चौकातच बनविल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सगळा तांत्रिक तपास पूर्ण करुन, त्या भाईची कुंडलीच काढली. कधी शूट झाला, तो कधी एडिट झाला, तो कधी अपलोड केला… हे सगळं पोलिसांनी शोधून काढलं. त्यानंतर याच फारुक भाईचं एक्झॅक्ट लोकेशनही पोलिसांनी शोधलं. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी पहाटेच या भाईवर त्याच्या राहत्या घरात झडप टाकली. पोलिसांनी हे सगळं इतक्या सकाळीच आवरलं, की या फारुक भाईला रिटेकची संधीच दिली नाही.
ही बातमी कळताच, संगमनेरमध्ये इतर भाई मात्र, पुढच्या तासा-दोन तासांत सावध झाले. काहींनी आपलं सोशल मीडियाचं अकाऊंटच डिलीट करुन टाकलं. काहींनी मोबाईल स्विच ऑफ केलाय. काहींनी आपल्या अकाऊंटची लोकल असणारी सेटींग्ज, प्रायव्हेट करुन टाकलीय. तर काहींनी थेट शहरातूनच धूम ठोकलीय. समाजाच दहशत करणाऱ्या व दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या अशा रिल्स स्टार्सचा पोलिसांनी कायद्यात राहून बंदोबस्त करायला हवा. यूपीमध्ये मुख्यमंत्री योगींनी जी स्टाईल वापरलीय, ती नकोय, पण किमान नाशिक पोलिसांसारखी ‘कायद्याचा बालेकिल्ला’वाली स्टाईल नगर पोलिसांनी वापरायला हवी. एकीकडे पोलिसांची प्रतिमा खराब होत असताना, पोलिसांनी गल्लीबोळातल्या या भाईंना तरी किमान धडा शिकवायला हवा. संगमनेरमध्ये आ. अमोल खताळ, नगरमध्ये आ. संग्राम जगताप, श्रीरामपूरमध्ये माजी खा. डाँ. सुजय विखे पाटील, पाथर्डीत आ. मोनिका राजळे हे नक्की स्थानिक पोलिसांना यात सहकार्य करतील.





