Explained

Explained : महाराष्ट्रच नाही, त्याने तामिळनाडू पोलिसांनाही दमवले होते; ‘तो’ कुख्यात आरोपी श्रीरामपूरला जेरबंद

नगर जिल्ह्यातच नाही, तर थेट तामिळनाडू पोलिसांच्या तोंडाला फेस आणणारा एक सराईत गुन्हेगार, नगर एलसीबीच्या पथकाने जेरबंद केला. शिर्डीत गेल्या महिन्यांत झालेल्या एका चेन स्नेकिंगच्या प्रकरणात, एलसीबीने त्याला श्रीरामपूरमधून शोधून काढला. शिर्डीत येणाऱ्या परराज्यातील भाविकांना लक्ष्य करुन महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून तो जबरी रस्तालूट करायचा. शिर्डीत त्याची समांतर टोळी होती. ही टोळी तो एकटाच ऑपरेट करायचा. पोलिसांनी या म्होरक्याला पकडले, परंतु त्याचे अन्य दोन साथीदार फरार आहेत. पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत. नेमका कोण आहे हा गुन्हेगार व काय होतं प्रकरण हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत…

15 जानेवारी 2026 ला शिर्डीत एक धक्कादायक प्रकार घडला. धारवाड जिल्ह्यातील नविनकुमार निंगारेड्डी कोनारेड्डी हे कुटुंबासह साईदर्शनाला शिर्डीला आले होते. पहाटेच त्यांनी आपल्या कुटुंबासह साईदर्शन घेतले. दर्शनानंतर ते मंदीराबाहेर पडताच हाँटेल अलौकिकच्या परिसरात मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. काही सेकंदातच ही घटना घडली.

नवीनकुमार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याच्या दोन चेन व एक मंगळसूत्र असा सुमारे 112 ग्रॅमचा ऐवज या चोरट्यांनी लुटून नेला होता. आरडाओरडा करेपर्यंत या दोन चोरट्यांनी आपल्या दुचाकीवर धूम ठोकली. पोलिस रेकाँर्डला सुमारे 5.60 लाखांची लूट दाखल करण्यात आली होती. शिर्डी पोलिासांनी गुन्हा रजिस्टर नंबर 36-2026 अन्वये कलम 309 (4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

शिर्डीतील गुन्हेगारी संपविण्यासाठी माजी खा. डाँ. सुजय विखे पाटील स्वतः लक्ष घालून असल्याने पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला ही टोळी पकडण्याची जबाबदारी दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे तपास करत असताना हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण (वय ४०, रा. अशोकनगर, श्रीरामपूर) याने केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी श्रीरामपूर परिसरातून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा आपल्या साथीदार गणेश विजय चव्हाण याच्यासह केल्याची कबुली दिली. तसेच लुटलेले दागिने राखी गणेश चव्हाण हिच्या माध्यमातून एका सोनाराकडे विकल्याचेही उघड झाले. हे दोघेही अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. विकास चव्हाण याच्याकडून १० ग्रॅम सोन्याची लगड व यामाहा मोटारसायकल असा एकूण २.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पकडण्यात आलेला विकास उर्फ राहुल चव्हाण हा साधासूधा आरोपी नव्हता, हे तपासात पुढे आले. या गुन्हेगाराचा क्राईम ग्राफ अत्यंत धक्कादायक होता. विकास चव्हाण याने 2009 ते 2016 या सात वर्षांत तामिळनाडूमध्ये दरोड्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगली आहे. तब्बल सात वर्षे त्याला तुरुंगात ठेवण्यात आले होते. 2016 मध्ये बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोर्‍यांचा सपाटा लावला होता. तपासात आरोपीकडून शिर्डी, राहाता, संगमनेर तालुका व सिन्नर येथे घडलेल्या ७ चैनस्नॅचिंगच्या गुन्ह्यांची उकल झाली.

विशेष म्हणजे आरोपीवर यापूर्वीही अहिल्यानगर जिल्हा व तामिळनाडू राज्यात दरोडा, जबरी चोरी व दरोड्याच्या तयारीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. पोलिस दप्तरी महत्त्वाचा आरोपी म्हणून तो कुख्यात होता. सध्या विकासला पुढील तपासासाठी शिर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. शिर्डीतील बाहेरच्या भाविकांना टार्गेट करुन ही टोळी लुटायची. आता उर्वरीत दोघांचा शोध सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button