उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनरेखा असणारे भंडारदरा धरण 10 डिसेंबर 2026 ला 100 वर्षांचे होईल. धरणाची हीच शंभरी जंगी नियोजनाने साजरी होणार आहे. भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील याच शताब्दी कार्यक्रमाचे नियोजन करत आहे. गुरुवारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यासमवेय या कार्यक्रमानिमित्त बैठक घेतली. पुर्ण बारा महिने हा कार्यक्रम चालणार आहे.
शिवाय स्थानिक लोककलावंतांनाही या कार्यक्रमात सहभागी केले जाणार आहे. हे धरण फक्त पाण्याची गरज भागविणारे नाही, तर नगरकरांच्या अनेक अमिट आठवणींचे साक्षीदार आहे. या धरणाने जशी नगरकरांना भूरळ घातलीय, तशीच भुरळ अगदी चित्रपट अभिनेते, राजकारणी यांनाही घातलीय. भंडारदरा धरणाचे हीच वैशिष्ट्ये आज आपण पाहणार आहोत…
अकोले तालुक्यात भंडारदरा धरणा आहे. काळ्या पाषाणातील या ब्रिटिशकालीन धरणाच्या निर्मितीची कथाही तेवढीच रंजक आहे. संगमनेर तालुक्यातील ओझर येथे 1893 मध्ये प्रवरा नदीवर ब्रिटीशांनी बंधारा बांधला. परंतु तो अपूरा पडू लागला. उन्हाळ्यातही पाणीपुरवठा करता यावा, यासाठी साठवण तलाव म्हणून भंडारदरा गावाजवळ दगडी धरण बांधण्याचे ठरले. ऑगस्ट 1907 मध्ये धरण बांधण्याच्या या प्रस्तावास मंजुरी मिळाली. बांधकामासाठी भंडारदरा येथे स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली.
प्रत्यक्ष धरण बांधकामास 1910 मध्ये सुरुवात झाली. पहिल्या तीन वर्षातच भिंतीचे 75 फूट उंच बांधकाम झाले. 1920-21 मध्ये भिंतीचे बांधकाम 200 फूट उंचीपर्यंत पोहचले. त्याच वर्षात नोव्हेंबर 1920 मध्ये धरणातून प्रथमच सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. ऑगस्ट 1916 मध्ये धरण परिसरात प्लेगचा प्रादुर्भाव झाला. 1918-19 या वर्षात अकोले तालुक्यात दुष्काळ पडला. या कसोटीच्या काळात भंडारदरा धरणाने सुमारे आठ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देत मोठा आधार दिला.
मूळ प्रस्तावानुसार 250 फूट उंचीचे धरण बांधून त्यात 240 फुटापर्यंत पाणी साठवण्याचे नियोजन होते. पण पुढे आधी 260 फूट आणि नंतर 270 फूट उंचीपर्यंत धरण बांधकाम करावयाचे व त्यात 260 फूट उंचीपर्यंत पाणी साठवायचे असे निश्चित करण्यात आले. बांधले तेव्हा भंडारदरा हे देशातील सर्वात उंच धरण होते. 1910 मध्ये सुरू झालेल्या या धरणाचे बांधकाम 1926 मध्ये पूर्ण झाले.
10 डिसेंबर, 1926 रोजी तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते धरणाचे लोकार्पण करण्यात आले. 1940-41 मध्ये धरणाच्या सांडव्यावर पाच साडेपाच फूट उंचीची भिंत बांधण्यात आली. त्यामुळे आता धरणात 265.70 फूट उंचीपर्यंत पाणी साठवण्यात येते. त्यामुळे धरणाची क्षमता 11 हजार 39 दशलक्ष घनफूट झाली आहे. याच धरणाला सुरुवातीला विल्सन डॅम संबोधले गेले. आता त्याचे नाव भंडारदरा धरण झाले. आता हेच धरण यावर्षी 100 वर्षांचे होत आहे. या जलाशयाच्या संवर्धनासाठी व या भागात निसर्ग पर्यटनाच्या संधी निर्माण करून देण्यासाठी, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री हे देखील या समितीचे सदस्य आहेत.
याच शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा आढावा नुकताच पालकमंत्री विखेंनी घेतला. या परिसरात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचा बारा महिन्यांचा कार्यक्रम तयार करण्यात यावा. हे करत असताना स्थानिक लोककलांचा यात सहभाग घ्यावा, जेणेकरून स्थानिक लोककलेला वाव मिळण्याबरोबरच रोजगार निर्मितीमध्ये वाढ होण्यास मदत होईल. या ठिकाणी तंबू निवास व्यवस्था, विद्युत रोषणाई यांसारख्या आकर्षक बाबींचा समावेश करावा. परिसरात जागेची कमतरता असल्याने त्याबाबत सुयोग्य नियोजन करावे. वन विभागानेही पर्यटनाच्यादृष्टीने आवश्यक तो आराखडा तयार करावा, अशा सुचना त्यांनी दिल्या.
भंडारदरा धरण परिसरात आत्तापर्यंत १०८ पेक्षा जास्त चित्रपटांचे चित्रीकरण झालेय. शिवाय सुपरहिट ठरलेली पन्नासपेक्षा अधिक गाणीही येथेच चित्रिकरण करण्यात आलीय. वैजयंतीमालाचे ‘मै तो कबसे खडी इस पार…’ मधूमती चित्रपटातील ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’, आणि राजेश खन्नाचे ‘ये शाम मस्तानी, मदहोश किये जा’ अशी कित्येक सदाबहार गाणी भंडारदरा येथील धबधब्यावर व परिसरातच चित्रित करण्यात आली आहेत. मराठी चित्रपटांतूनही भंडारदरा, रंधा धबधबा अनेकदा दिसलाय.
‘सजनी ग भुललो मी, काय जादू झाली…’ हे गाणेही या परिसरातच चित्रित झालेय. राजकपूर, दिलीप कुमार, वैजयंतीमाला, मीनाकुमारी, नर्गिस, अशोक कुमार, राजेश खन्ना, शर्मिला टागोर, मला सिन्हा, मधुबाला यांच्यापासून ते आत्ताच्या सलमान खान, अजय देवगण, काजोल, अशोक सराफ अशा अनेक दिग्गज कलाकारांना या धरणाने व परिसराने भुरळ घातली होती. त्यामुळेच भंडारदरा हे फक्त तहान भागविणारे नाही, तर आपल्या हृदयाच्या कोंदणात साठलेले धरण आहे…





