
नगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. हातेची पिके वाहून गेली होती. अनेक ठिकाणी तर शेतीही वाहून गेली होती. अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने वेळीच पावले उचलली. तातडीने सगळे पंचनामे करुन, दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई टाकण्यात आली. सरकारने दिवाळीपूर्वी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 864 कोटी रुपये वाटले. आता पुन्हा रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांना प्रत्येकी 10 हजारांची मदत देण्यात आली आहे. सरकारने पुन्हा 626 कोटी 26 लाख रुपये दिल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. ही मदत नेमकी कशासाठी आहे? ती कुणाला मिळेल? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
सप्टेंबर महिन्यांत राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही जिल्ह्यात अक्षरशः थेमान घातले. या जोरदार पावसाने शेतीचे होत्याचे नव्हते झाले. नगर जिल्ह्यातही सुमारे 80 टक्के शेतीचे नुकसान झाले. या गंभीर प्रसंगी महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. महिनाभरात दिवाळीचा सण होता. दिवाळीच्या सणापूर्वी शेतकऱ्यांना फूल न फुलाची पाकळी मदत करण्याचा चंग सरकारने बांधला. नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात आले. महसूल व इतर सर्व सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत, सरकारने अगदी विक्रमी वेळात सर्व पंचनामे पूर्ण केले. नगर जिल्ह्यातील 6 लाख 26 हजार 265 हेक्टर क्षेत्र, नुकसानग्रस्त म्हणून गणले गेले. जिल्ह्यातील सुमारे 8 लाख 53 हजार 265 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती बाधित होण्याची गेल्या काही वर्षातील ही कदाचित पहिलीच वेळ होती. जिल्ह्यातील सर्व शेतकरीवर्ग दुःखाच्या खाईत लोटला असताना महायुती सरकारने ठामपणे निर्णय घेतले. नगरच्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात, दिवाळीपूर्वी 864 कोटींची मदत देण्यात आली. त्यातून थोड्या-फार प्रमाणात का होईना, पण शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता आली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले गेले.
त्यानंतर आता सरकारने दुसऱ्या टप्प्यात पुन्हा मदत जाहीर केली. बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामात दिलासा देण्यासाठी, महायुती सरकाने बियाणे व खतांसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील 8 लाख 53 हजार 265 शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. प्रतिहेक्टरी 10 हजार रुपयांप्रमाणे या मदतीचे वितरण होणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. रब्बी हंगामात पेरायचे कसे? हा प्रश्न पडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांच्या सहकार्यातून ही मदत मिळाल्याचेही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एकूण 1 हजार 472 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहितीही विखेंनी दिली. कदाचित ही नगर जिल्ह्यासाठी विक्रमी मदत असेल, असेही बोलले जात आहे. याबाबत अधिक माहिती देताना मंत्री विखे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. ही फक्त घोषणा नव्हती. महायुती सरकारने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणाला पहिल्या टप्प्यात मदत दिली गेली. आता पुन्हा रब्बीच्या पार्श्वभूमिवर प्रति हेक्टरी 10 हजारांची मदत खते व बियाण्यांसाठी देण्यात आली आहे. लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.”
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानीनुसार विविध भरपाई योजना लागू आहेत. यामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाते. तसेच, कृषी विमा योजनेअंतर्गत पिकांच्या नुकसानीसाठीही भरपाईची तरतूद आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या प्रकारानुसार आणि हेक्टरनुसार वेगवेगळे दर लागू होतात. महायुती सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी यापूर्वी गोड केली आता रब्बीसाठीही हातभार लागल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.





