
अहिल्यानगर शहरात एका मोठ्या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले आहे. शहरातील नामांकित ‘रेज फाऊंडेशन’ या धर्मादाय संस्थेवर बनावट कागदपत्रे आणि खोट्या नोटरीच्या आधारे बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
संस्थेचे सचिव अमित कोठारी यांच्या वडिलांच्या निधनानंतर बँक व्यवहार तपासताना ही फसवणूक उघड झाली. तपासात असे आढळले की, फेब्रुवारीे २०२२ मध्ये कधीच न झालेल्या सर्वसाधारण सभा कागदोपत्री दाखवून, सदस्यांच्या बनावट सह्यांसह डॉ. राकेश कांतीलाल गांधी व त्यांच्या पत्नी राजश्री राकेश गांधी यांची संस्थेच्या पदावर निवड झाल्याचे भासवण्यात आले.
विशेष म्हणजे, या कागदपत्रांवर वापरलेली नोटरी सही व शिक्का बनावट असल्याचे केंद्रीय नोटरी सेलच्या चौकशीत स्पष्ट झाले असून, संबंधित नोटरींची सनदही रद्द करण्यात आली आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात डॉ. राकेश गांधी, त्यांची पत्नी राजश्री गांधी व मोहित बोरा यांच्यासह इतरांविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याआधीही डॉ. गांधी यांच्यावर बँकेत साडेआठ कोटींचे बनावट कर्ज मंजूर केल्याचा गुन्हा दाखल असून, या नव्या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.





