
मंडळी, अहिल्यानगरमधील शेतकऱ्याने सर्वच शेतकऱ्यांना प्रेरणा ठरेल अशी कर्तबगारी करून दाखवलीये. अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा बद्दी गावातील भीमराज लांडगे, सुभाष लांडगे आणि बाळासाहेब लांडगे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय.
१४ एकर क्षेत्रावर उभी केलेली त्यांची संत्री बाग आज त्यांना तब्बल दीड कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न देण्याच्या मार्गावर आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी लांडगे कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत आज ही बाग पूर्णपणे बहरली आहे. पारंपरिक पिकांत खर्च जास्त आणि उत्पन्न अनिश्चित.
पाणीटंचाई आणि बाजारभावाचा धोका. यातून बाहेर पडण्यासाठी फळबाग शेती हा किती प्रभावी पर्याय आहे, हे लांडगे कुटुंबाने सिद्ध करून दाखवलं. विशेष म्हणजे, त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा प्रभावी वापर, नियंत्रित फवारणीमुळे झाडांची वाढ जोमदार झाली.
आज एका झाडाला सरासरी १२ कॅरेटपर्यंत संत्र्यांचे उत्पादन मिळत आहे. फळांचा रंग, आकार आणि चव उत्कृष्ट असल्यामुळे बाजारात या संत्र्यांना उच्च दर मिळतोय. मंडळी, ही केवळ एका शेतकऱ्याची यशोगाथा नाही, तर संपूर्ण परिसरासाठी दिशादर्शक उदाहरण ठरणारं आहे.





