
अहिल्यानगर जिल्ह्यातील एक गाव सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतय. कारण या गावात शेकडो एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेतीचा मोठा प्रयोग सुरू झाला आहे.
मंडळी, पारनेर तालुक्यातील कासारे गावाने आता सेंद्रिय शेतीची नवी वाट धरली आहे. गावचे सरपंच शिवाजी निमसे यांनी विषमुक्त शेतीचा संकल्प केला असून पहिल्या टप्प्यात तब्बल ४०० एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती राबवली जाणार आहे.
या उपक्रमासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून १०० महिला आणि शेतकरी बचत गटांना माफक दरात सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे अधिकाधिक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, कासारे गावाची ही वाटचाल एका दिवसात झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून गावात पाणलोट आणि जलसंधारणाची प्रभावी कामे झाली आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून कांदा, वटाणा, घेवडा, टोमॅटो, गहू आणि हरभरा यांसारख्या पिकांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे, विषमुक्त शेतीसोबतच उत्पादनातही वाढ झाल्याचा दावा करण्यात येत आहे. म्हणूनच आज कासारे गावाची ओळख केवळ एक गाव म्हणून नाही, तर सेंद्रिय शेतीच्या यशस्वी मॉडेल म्हणून निर्माण होत आहे.





