
अहिल्यानगरकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाचा उन्हाळा संपत असताना जिल्ह्यात उष्माघाताचे मोठे संकट टळल्याचे चित्र दिसत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तापमानाचा पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने आधीच विशेष तयारी केली होती. जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष उष्माघात म्हणजेच हिट स्ट्रोक कक्ष सुरू करण्यात आले होते.
एप्रिल महिन्यात उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवली. मात्र मे महिन्याच्या उत्तरार्धात वातावरणात बदल झाला. अधूनमधून झालेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली.
आरोग्य विभागाच्या मते, यंदा उष्माघात कक्षांची फारशी गरज भासली नसली तरी संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी केलेली तयारी अत्यंत महत्त्वाची ठरली. मात्र तज्ज्ञांचा इशारा आहे की, हवामान बदलामुळे भविष्यात उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होऊ शकतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची तयारी कायम ठेवणे आवश्यक आहे. सध्या तरी पारा घसरल्याने आणि वातावरणात बदल झाल्याने अहिल्यानगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.





