
मंडळी अलार्म बंद करण्यासाठी हातात घेतलेला फोन कधी 30 मिनिटांच्या सोशल मीडिया स्क्रोलिंगमध्ये बदलतो, हे अनेकांना कळतही नाही. पण तज्ज्ञांच्या मते, सकाळची ही सवय तुमच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.
डॉ. कुणाल सूद यांच्या मते, जागे झाल्यानंतर मेंदू हळूहळू सक्रिय होत असतो. अशावेळी नोटिफिकेशन्स, मेसेजेस, ईमेल्स आणि सोशल मीडियाचा भडिमार मेंदूवर अतिरिक्त ताण निर्माण करतो. त्यामुळे शरीरातील “कॉर्टिसोल” म्हणजेच तणाव वाढवणारे हार्मोन अधिक सक्रिय होऊ शकते. याचे परिणाम काय? तर, चिंता आणि तणाव वाढू शकतो, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते, दिवसभर चिडचिड आणि मानसिक थकवा जाणवू शकतो शिवाय FOMO मुळे वारंवार फोन तपासण्याची सवय लागते.
म्हणून तज्ज्ञ सांगतात की, जागे झाल्यानंतरची पहिली 20-30 मिनिटे स्क्रीनपासून दूर राहणे फायदेशीर ठरू शकते. त्याऐवजी पाणी प्या, थोडं चालून या किंवा शांतपणे दिवसाची सुरुवात करा. तुमचा दिवस मोबाईलने नाही, तर स्वतःच्या मनःशांतीने सुरू करा!





