
मंडळी, सफरचंदाची शेती फक्त काश्मीरमध्येच होते ? हा समज आता पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. कारण, पाथर्डी तालुक्यातील मिरी गावातील आयटी इंजिनिअर शाहरुख शेख यांनी भर उन्हाळ्यात आपल्या शेतात सफरचंदाची यशस्वी फळधारणा करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पुण्यात आयटी क्षेत्रात काम करणारे शाहरुख यांनी कोरोना काळातील ‘वर्क फ्रॉम होम’चा फायदा घेत शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘हरमन-99’ या विशेष सफरचंद वाणाची लागवड केली. या जातीला बर्फ किंवा तीव्र थंडीची गरज नसते.
योग्य तापमान, सूर्यप्रकाश आणि पाण्याचा निचरा असेल तर हे पीक उत्तम येऊ शकते. विशेष म्हणजे, शाहरुख यांनी फक्त सफरचंदच नाही तर 15 प्रकारचे आंबे, ड्रॅगन फ्रूट, अंजीर, जांभूळ, संत्री आणि अनेक फळझाडांची समृद्ध बाग तयार केली आहे.
त्यांचा हा प्रयोग ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, आधुनिक तंत्रज्ञानासोबत शेतीतही मोठ्या संधी उपलब्ध असल्याचा संदेश देत आहे.





