Latest

सासू-सासऱ्यांच्या मानसिक छळामुळे जावयाने केली आत्महत्या ! पाथर्डीतील धक्कादायक घटना

मानसिक त्रास किती भयानक ठरू शकतो ? याचं हादरवून टाकणारं उदाहरण पाथर्डी तालुक्यातुन समोर आलं आहे. खरवंडी येथील 35 वर्षीय प्रदीप केळगंद्रे यांनी कथित सासरच्या मानसिक छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात सासू आणि सासऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, प्रदीप यांचा विवाह 2022 मध्ये मिरजगाव येथील योगिता इंगळे यांच्यासोबत झाला होता.

मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून धमक्या, पैशांची मागणी आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पत्नी गरोदर असल्याने प्रदीप यांनी तिला उपचारासाठी माहेरी सोडलं होतं. त्यानंतर पत्नी आणि मुलाशी बोलू दिलं जात नसल्याने ते मानसिक तणावात होते, अशी माहिती समोर आली आहे.

ही घटना मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक संवाद किती महत्त्वाचा आहे, याची गंभीर जाणीव करून देते. अशा परिस्थितीत वेळेत मदत घेणं आणि संवाद कायम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button