Latest

सावधान! तुम्ही शिलाई मशिन घेताय का? नगर जिल्ह्यात घातला गेलाय 5 लाखांचा गंडा…

सरकारकडून महिलांच्या स्वयंरोजगारासाठी विविध प्रकल्प राबविले जात आहेत. अशीच एक योजना आहे, शिलाई मशिनची. याच योजनेत कर्जत तालुक्यातील 439 बचत गटातील महिलांना गंडा घालण्यात आला आहे. या महिलांची तब्बल 4 लाख 82 हजार 900 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शिलाई मशिन योजनेच्या नावाखाली प्रत्येकीकडून 1100 रुपये उकळण्यात आले. मात्र एकाही महिलेला मशिन मिळालेले नाही. याप्रकरणी पंचायत समितीच्या सीआरपी सरोज सुभाष सुतार (रा. राशीन) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दाखल केली. दाखल फिर्यादीनुसार, सरोज सुतार या 2019 पासून सीआरपी म्हणून काम करतात.

प्रशांत अडसूळ (रा. कोरेगाव) याने त्यांच्याशी संपर्क केला. 7,500 रुपयांत दोन शिलाई मशिन देतो. तुम्ही सध्या 1100 रुपये बुकिंगसाठी भरा, असे सांगून त्याने सुतार यांचा विश्वास संपादन केला. यानंतर सुतार व इतर महिलांनी तालुक्यातील 439 गरजू महिलांकडून पैसे गोळा करून 4 लाख 82 हजार 900 रुपये अडसूळकडे सुपूर्द केले.

पैसे भरून अनेक महिने उलटूनही एकाही महिलेला शिलाई मशिन मिळाले नाही. पैसे परत मागितल्यावर आरोपीकडून टाळाटाळ केली जात असून फोनही उचलला जात नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुतार यांनी थेट कर्जत पोलिस ठाणे गाठत या संशयिताविरोधात तक्रार केली.

आरोपीला तत्काळ अटक करुन आम्हाला पैसे मिळवून द्या, अशी मागणी फसवणूक झालेल्या महिलांनी केली आहे. या प्रकारामुळे कर्जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button