Latest

गवंडी कामाचा कंटाळा आला आणि भोंदू बनला ! गोष्ट राजेंद्र गडगेच्या फसवणुकीची

वडगाव पान येथील राजेंद्र गडगे हा सुरुवातीला गवंडी म्हणून काम करत होता. पाणी साठवण्यासाठी सिमेंटच्या टाक्या तयार करण्याचा त्याचा व्यवसाय होता. मात्र हे काम मेहनतीचे असल्याने त्याने हळूहळू वेगळा मार्ग स्वीकारला आणि स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत भोंदूगिरीकडे वळला.

गेल्या सुमारे १३ वर्षांपासून तो अघोरी उपचारांच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आर्थिक फायदा मिळवत असल्याचे समोर आले आहे.वडगाव पान परिसरात त्याने ‘दत्तधाम’च्या नावाने मोठा प्रभाव निर्माण केला. त्याने सुरू केलेल्या यूट्यूब चॅनलमुळे त्याची ओळख राज्यभर पसरली.

कर्करोगासारखे गंभीर आजार बरे करतो, अपत्यप्राप्ती होते, तसेच मंत्रांनी घरातील अडचणी दूर होतात, असे आश्वासन देत तो लोकांकडून अकरा हजारांपासून ते एकावन्न हजारांपर्यंत रक्कम घेत असल्याचे उघड झाले. सोशल मीडियामुळे त्याच्याकडे राज्याच्या विविध भागांतून लोक येत असल्याचेही समजले.‘दत्तधाम सरकार’ नावाने आश्रम चालवत तो हे प्रकार करत होता.

दैवी शक्तीच्या नावाखाली उपचार देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याच्या तक्रारी बराच काळ येत होत्या, मात्र कारवाई होत नव्हती. अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ॲड. रंजना गवांदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.या प्रकरणी राजेंद्र गडगे, त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी, सूरज शिंदे आणि मधुकर शिंदे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button