
अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, खरीप पिकांचे नुकसान आणि अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांनी जिल्हा सहकारी बँकेची आगामी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, असे गडाख यांनी म्हटले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकारी साखर कारखाने, विविध कार्यकारी सोसायट्या, महिला बचत गट आणि शेतकरी सभासदांना पतपुरवठा केला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणात बँकेची महत्त्वाची भूमिका आहे.
निवडणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून बँकेच्या आर्थिक हिताचे संरक्षण करावे, अशी भूमिका गडाख यांनी मांडली. निवडणूक बिनविरोध झाल्यास नेत्यांचा प्रचारातील वेळ वाचेल आणि तो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वळवता येईल, असे त्यांनी सांगितले.
१९९१ ते २०२१ या काळात संचालक आणि सात वर्षे चेअरमन म्हणून काम केल्याचा अनुभवही त्यांनी नमूद केला.





