
श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण-खानापूर रोडवर सकाळी माय-लेकरावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली. रावसाहेब वाघ आणि त्यांची ६५ वर्षीय आई ताराबाई वाघ हे दुचाकीवरून शेताकडे जात असताना उसाच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटरसायकलवर झडप घातली.
हल्ल्यामुळे दुचाकी घसरली आणि रावसाहेब काही अंतरावर जाऊन पडले. मागे बसलेल्या ताराबाई मात्र बिबट्याच्या तावडीत सापडल्या. बिबट्याने त्यांच्या डोक्यावर, कानावर आणि हातावर पंजाने वार केले.
मात्र हातात असलेल्या धारदार विळ्याने ताराबाईंनी बिबट्याचा प्रतिकार केला. त्याचवेळी मुलगा रावसाहेब मदतीला धावून आल्याने बिबट्याने तिथून पळ काढला.
या हल्ल्यात ताराबाई गंभीर जखमी, तर रावसाहेब किरकोळ जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर ताराबाईंना पुढील उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आले.
परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.





