Explained

युद्धाची झळ नगर जिल्ह्यातही जाणवतेय… विद्यार्थ्यांवर थेट उपासमारीची वेळ

आखाती देशात युद्ध सुरु आहे. त्याची झळ आता आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यालाही बसलीय. सगळं सुरळीत असल्याचं प्रशासन सांगत असलं तरी, गॅस गोडाऊनबाहेर दिसणाऱ्या रांगा, पेट्रोल पंपावरील गर्दी, गॅस पंपावरील रिक्षांच्या रांगा बरंच काही सांगून जातंय. शिवाय नगर शहरातील तब्बल 100 पेक्षा जास्त लहान-मोठे हाँटेल्सही गॅसच्या तुटवड्यामुळे बंद करावी लागली आहेत. अनेक खानावळीही बंद झाल्या आहेत. युद्ध आखाती देशात सुरु असलं तरी, त्याचा त्रास मात्र नगरकरांना सोसावा लागत आहे.

गेल्या आठवड्यापासून सरकारनं व्यावसायिक एलपीजी सिलेंडर देणं बंद केलंय. त्यामुळे छोटे मोठे हाँटेल व्यावसायीकांना हाँटेल बंद करण्याची वेळ आलीय. वडापावच्या गाड्या, रगडा-पॅटीसच्या गाड्या किंवा इतर सर्व लहान मोठे खाद्यविक्रेत सध्या व्यवसाय बंद करुन घरी बसले आहेत. इतरांच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या विक्रेत्यांवरच सध्या उपासमारीची वेळ आली आहे. घरगुती गॅसच्या बाबतही तसंच… सरकारनं घरगुती गॅस वितरणाला प्राधान्य दिल्याचं सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत स्पष्ट आदेश दिले.

परंतु तरीही शहरापासून गावापर्यंत सगळीकडेच गॅसचा तुटवडा असल्याचं दिसलं. यापूर्वी 21 दिवसांनी मिळणारा गॅस आता थेट 30 दिवसांनी मिळतोय. शिवाय बुकींग करुनही प्रतिक्षा करावी लागतेय. त्यामुळे नागरिक सिलेंडर पदरात पाडून घेण्यासाठी गॅस एजन्सीपुढे तासनतास उन्हात उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या गर्दीमुळे काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेलचालक, खानावळ चालक व इतर व्यावसायिकांनी घरगुती सिलेंडर चढ्या दराने खरेदी करण्यास सुरूवात केल्याचेही सांगितले जात आहे. काळ्या बाजारात घरगुती सिलेंडरचे दर दुप्पट झाल्याचीही चर्चा आहे. हाँटेलचंही तसंच झालंय. विशेष म्हणजे ज्या हाँटेलच्य बाहेर येथे चुलीवरचं जेवण मिळेल, अशा पाट्या आहेत. ते हाँटेल्सही सध्या बंद आहेत. सगळ्यात जास्त त्रास, नगर शहरात शिक्षण घेणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अनेक मेस व खानावळी बंद आहेत. त्यामुळे जेवणाची पंचायत झाली आहे.

गॅसच्या तुटवड्यात नगर शहरातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नुसतं नगर शहरातच नाही तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीही रिक्षा उभ्या असल्याचं चित्र आहे. नुसत्या नगर शहराचा विचार केला तर शहरात तब्बल सहा ते सात हजार रिक्षा आहे. परंतु एलपीजी गॅस फक्त तीन पंपावर मिळतो. त्यापैकी बसस्थानकाजवळी पंप हा रस्त्याच्या कामामुळे बंद आहे. त्यामुळे शहर, भिंगार व केडगाव परिसरातील रिक्षाचालक सक्कर चौकातील पंपावर गर्दी करत आहेत.

पहाटेपासूनच रिक्षाचालकांना रांगेत उभे राहून, तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. नवीन टिळक रस्त्यावर सक्कर चौकापासून नंदनवन लॉनपर्यंत तसेच स्टेशन रस्त्यावर उड्डाणपुलाखाली रिक्षांच्या लांबलचक रांगा दिसत आहेत. तुटवड्यामुळे गॅसची दरवाढही झाली आहे. चार दिवसांपूर्वी 65 रूपये किलो दराने मिळणारा एलपीजी गॅस, अगोदर 75 रूपये किलो दराने, तर गुरूवारपासून 85 रूपये किलो दराने विकला जात असल्याचं रिक्षाचालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे नाईलाजास्तव रिक्षाचालकांना भाडेवाढ करावी लागली आहे.

यापूर्वी बसस्टँडपासून सावेडीपर्यंत जाण्यासाठी 20 रुपये द्यावे लागत होते. आता 40 रुपये द्यावे लागत आहेत. एमआयडीसीला जाण्यासाठी 60 रुपये द्यावे लागत आहेत. सिव्हिल हॉस्पिटलला जाण्यासाठी आता 30 रुपये, पाईपलाईनला जाण्यासाठी 50 रुपये द्यावे लागत आहेत. केडगाव, शास्त्रीनगर, कायनेटीक कंपनी, भिंगार आदी ठिकाणी जाणाऱ्या रिक्षांनीही दुप्पट भाडेवाढ केली आहे. भाडेवाढ करुनही शुक्रवारपासून शहरातील एलपीजी पंपांवर रिक्षांसाठी गॅस मिळत नव्हता. गॅसअभावी अनेक रिक्षा बंद होत्या. गॅस पुरवठा सुरळित न झाल्यास रिक्षा चालकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button