Latest

Ahilyanagar Crime | असाध्य रोगांचा ‘भेसळ जिहाद’; नेमकं काय होतं, भेसळ दूध प्रकरण?

अहिल्यानगर जिल्ह्यात पांढऱ्या दूधाचा काळा धंदा दोन महिन्यांपूर्वी उजेडात आला. जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे एलसीबी आणि अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून बनावट दूध तयार करणारे रॅकेटचा पर्दाफाश केला. पॅराफिन व केमिकलसह घातक क्रिमचा वापर करून हे बनावट दूध तयार केले जात होते. थेट एका शेतकऱ्याच्या गोठ्यावरच पोलिसांनी लाईव्ह पंचनामा केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या शेतकऱ्यासह त्याला क्रिमचा पुरवठा करणाऱ्या शेख बंधूंना अटक केली. त्यानंतर तपासात तब्बल 31 जणांना संशयित आरोपी करण्यात आले. आता याच बनावट दूध प्रकरणात राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका गोठ्यात पोलिसांनी पुन्हा तपास केला. काहींनी या सगळ्या प्रकाराला भेसळ जिहाद हे नाव दिल्याने हे प्रकरण राज्यभर चर्चेत आलेय. नेमका काय आहे हा भेसळ जिहाद व पोलिसांनी नेमकं काय केलंय.

गेल्या फेब्रुवारी महिन्यांत, अहिल्यानगर जिल्ह्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं. अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये भेसळयुक्त दूध तयार करून ते चांगल्या दुधात मिक्स केलं जात असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. या भेसळीची माहिती मिळताच अन्न औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस फक्राबाद येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यावर पोहोचले.

तेथे पोलिसांनी दोघांना जेरबंद केलं. शेतकरी रामदास उबाळे याने समीर शेख, आफताब शेख या व्यापाऱ्यांकडून हे दूध तयार करण्याचं प्रशिक्षण व साहित्य घेतल्याचं तपासात समोर आलं. तब्बल1200 लिटर लिक्विड पॅराफेन हे रसायन आणि आणखी काही रासायनिक पदार्थ त्यावेळी जप्त करण्यात आले. आता हे शेख बंधू कोण? ही माहिती त्याहून धक्कादायक आहे.

बनावट दूध तयार करण्यासाठी लागणारी घातक क्रिम पुरवठा हा समीर शेख करत होता. आता हा समीर मुळचा देवळाली प्रवराचा… त्याचे सख्खे भाऊ शाकीर शेख व सद्दाम शेख हे तिघे मिळून हे सगळं रॅकेट चालवत होते. आता या शेख बंधूंची क्राइम हिस्ट्री त्याहून खतरनाक आहे. काही वर्षांपूर्वी, श्रीगोंदा पोलिसांनी दूधात पॅराफिन व व्हे पावडर मिसळून, दूधाची भेसळ करणारे रॅकेट उघड केले होते. मात्र त्यावेळी भेसळीचे दूध तयार केले जात नव्हते.

फक्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना व डेअरी चालकांना पॅराफीन व व्हे पावडर पुरवठा करुन दुधाची गुणवत्ता वाढवली जात होती. याच गुन्ह्यात त्यावेळी समीर शेख हा आरोपी होता. त्याला अटकही झाली होती. परंतु काही दिवसांनी तो जामीनावर बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याने यापेक्षा खतरनाक प्लॅन करण्याचं ठरवलं.

समीर कमरुद्दीन शेख याने त्याचे सख्खे भाऊ शाकीर व सद्दाम यांना सोबत घेत, थेट बनावट दूध तयार करण्याचा फाँर्म्यूला शोधून काढला. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एक गोडाऊन भाड्याने घेऊन पॅराफिन, ‘9.5’ केमिकल, मिल्क क्रिम व पाणी यांचे मशीनव्दारे मिश्रण करून एक घातक क्रिम तयार केली. या एका लिटर क्रिमपासून सुमारे 20 लिटर दूध तयार करण्याचा धंदा त्यांनी मांडला. आता एक लिटर क्रिमपासून जर 20 लिटर बनावट दूध तयार होत असेल तर हा अगदी फायद्याचा धंदा होता.

गंदा था लेकीन धंदा था… या म्हणीप्रमाणे त्यांनी हा प्लॅन काही शेतकरी व डेअरी चालकांना समजून सांगितला. बनावट दूध डेअरीमध्ये गेल्यानंतर त्याची फॅट व डिग्री व्यवस्थित येत असल्याने अनेकांनी शेख बंधूंकडून ही घातक क्रिम घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर नगर जिल्ह्यात हजारो लिटर बनावट दूध तयार होऊ लागले. हे दूध खऱ्या दूधात मिक्स करुन ते विक्री होऊ लागले.

आता या घातक क्रिमच्या जाळ्यात, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा या तालुक्यातील काही महाभाग ओढले गेले. शेख बंधूंनी अगदी परफेक्ट साखळी तयार केली. शिवाय नाशिक व बीड जिल्ह्यापर्यंत हा धंदा वाढवला. देवळाली प्रवरा येथील गोडावूनमध्ये दर दोन महिन्यांना नवीन मशीन येऊ लागले. त्यातून पूर्वी होणारे काही हजार लिटरची बनावट क्रिम काही लाख लिटरपर्यंत पोहोचली. संपूर्ण शेख कुटुंबच या धंद्यात असल्याने, त्याची कुणकूण कुणालाही लागली नाही.

शेख बंधूंच्या अमिषाने काही दूध डेअरीचालक व काही दूध धंदा करणारे मोठे शेतकरी, या बनावट दूध धंद्यात उतरले. अखेर फक्राबाद येथील छाप्यात समीर शेख जेरबंद झाल्यानंतर एक एक साखळी उघड होऊ लागली. एलसीबीने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शेख बंधूंचे बँक स्टेटमेंट मिळवले. त्यानंतर ही घातक क्रिम कुणी-कुणी खरेदी केली व कुठपर्यंत गेली, हे उघड झाले. या तपासात तब्बल 31 संशयीतांना अटक करण्यात आली.

काही हिंदूत्ववादी संघटनांनी या प्रकाराला भेसळ जिहाद हे नाव दिल्यानंतर महाराष्ट्रभर याची चर्चा झाली. थेट विधानसभेतही हे प्रकरण गाजले. या क्रिमच्या दुधापासून अनेक गंभीर आजार होत असल्याचं निदान डाँक्टरांनी केल्यावर हे प्रकरण किती गंभीर होतं, याच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, अटक केलेले काही डेअरीचालक व गब्बर शेतकरी हे काही नेत्यांच्या जवळचे असल्याने, हे प्रकरण एलसीबी खोलपर्यंत सोडवेल का, हा प्रश्नही काहींनी उपस्थित केला.

आता याच प्रकरणातील संतोष धसाळ या आरोपीला पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी त्याच्या तांदूळवाडी येथील घरी मंगळवारी आणले. त्याच्याकडे काम करणाऱ्या आरडगाव येथील कामगारालाही ताब्यात घेण्यात आले. मंगळवारच्या या तपासानंतर, पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button