Latest

अहिल्यानगर महापालिकेत विरोधी पक्षनेता कोण? पुन्हा गेम होणार?

अहिल्यानगर महापालिकेत सत्तेची समीकरणे निश्चित झाली, महापौर-उपमहापौर निवडले गेले, समित्यांची पदवाटपही झाली पण एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. महापालिकेचा विरोधी पक्षनेता नेमका कोण होणार? मंडळी, महापालिका निवडणुकीला आता साडेचार महिने उलटले आहेत.

मात्र अद्याप विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे महापालिका वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला २७ जागा, भाजपला २५ जागा आणि शिंदेसेनेला १० जागा मिळाल्या. नियमाप्रमाणे दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचा नगरसेवक विरोधी पक्षनेता होतो. पण येथे भाजप सत्तेत सहभागी असल्याने विरोधी पक्षनेतेपदावर शिंदेसेनेचा दावा मजबूत मानला जात आहे.

शिंदेसेनेने अधिकृतपणे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र, इतका कालावधी उलटूनही महापौर ज्योती गाडे यांनी यावर कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. बोराटे यांच्या नावाला सत्ताधारी आघाडीतील काही घटकांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी नवीन राजकीय समीकरण जुळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे, काही राजकीय जाणकारांच्या मते सत्ताधारी गटातूनच एखाद्या नगरसेवकाला विरोधी पक्षनेतेपदी बसवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेत मोठा राजकीय गेम होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button