
अहिल्यानगरकरांनो, सावधान ! शहरावर आता दुहेरी संकट घोंगावतंय. एकीकडे कडक उन्हाची झळ आणि दुसरीकडे अतिनील किरणांचा वाढलेला धोका.. सध्या अहिल्यानगरमध्ये तापमान तब्बल ३९ अंशांपर्यंत पोहोचलंय. पण फक्त उष्णता वाढलीये असं नाही तर अतिनील किरणांचा निर्देशांक थेट ११.३ वर पोहोचलाय आणि हा स्तर अत्यंत धोकादायक मानला जातो. सामान्यतः हा निर्देशांक ५ च्या आसपास असणं अपेक्षित असतं. याचा थेट परिणाम त्वचा, डोळे आणि आरोग्यावर होऊ शकतो.
दरम्यान शहरातील हवेची गुणवत्ताही चिंताजनक होत चाललीये. अहिल्यानगरचा Air Quality Index सध्या ७४ मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतका नोंदवला गेलाय. तो मध्यम श्रेणीत असला तरी हवेत धूलिकणांचं प्रमाण झपाट्याने वाढलंय आणि यामुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास अशा समस्या जाणवू लागल्या आहेत.
तज्ज्ञांनी नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिलाय की, दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नका. बाहेर पडताना सनग्लासेस, टोपी, छत्री वापरा. धुळीच्या ठिकाणी मास्क वापरणं विसरू नका. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? प्रशासनाने यावर आणखी काही उपाययोजना करायला हव्यात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा..





