
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक अशी गोष्ट घडली आहे, ज्यामुळे इतिहासप्रेमी आणि संशोधकांचे लक्ष वेधले गेले आहे. मंडळी, म्हातारपिंप्री गावाजवळील पाझर तलावात गाळ काढताना एक पुरातन चौकोनी बारव, म्हणजेच पुष्करणी, आढळून आली आहे.
विशेष म्हणजे या बारवेत पाच ते सहा ओळींचा शिलालेखही सापडला आहे. त्यामुळे या ठिकाणाचा इतिहास आणखी उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतिहासानुसार, पानिपतच्या युद्धात शौर्य गाजवणारे सरदार जानराव वाबळे यांचा या परिसराशी संबंध होता. शिंदे घराण्याने त्यांना म्हातारपिंप्री आणि मढेवडगाव ही गावे दिली होती. त्यानंतर वाबळे घराण्याने येथे अनेक लोकहिताची कामे केल्याचे सांगितले जाते.
तलावातील गाळ काढताना ही बारव सापडल्यानंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर शिलालेखाचा अभ्यास करण्यात आला. या शिलालेखातून मराठाकालीन ग्रामव्यवस्था, जलव्यवस्थापन, धार्मिक श्रद्धा आणि त्या काळातील प्रशासनाची माहिती समोर आली आहे.
अभ्यासकांच्या मते, या बारवेचे बांधकाम जानराव वाबळे यांच्या मुलांनी गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी केले होते. शिलालेखात फारशी आणि अरबी भाषेतील काही शब्दही आढळून आले आहेत. त्यामुळे त्या काळातील भाषिक आणि सांस्कृतिक प्रभावांचाही अभ्यास करता येणार आहे.
इतिहासकारांच्या मते, हा शिलालेख केवळ एका बारवेची नोंद नाही, तर मराठाकालीन ग्रामीण जीवनाचे जिवंत चित्र उभे करणारा महत्त्वाचा पुरावा आहे.





