
नेवासाच्या कांद्याने आता थेट दुबईची वाट धरली आहे आणि ही बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत आहे.
मंडळी, नेवासा बाजार समितीच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या कांदा मार्केटमध्ये दर्जेदार कांदा मोठ्या प्रमाणात दाखल होत असून, त्याची दखल आता थेट परदेशातही घेतली जात आहे.
रविवारी तब्बल ३० टन कांदा कंटेनरद्वारे दुबईला रवाना करण्यात आला. या पहिल्या कंटेनरचे पूजन बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सभापती पाटील यांनी सांगितले की, नेवासा येथे कांदा मार्केट सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. बाजारात दर्जेदार कांदा उपलब्ध होत असल्यामुळे परदेशी व्यापाऱ्यांकडूनही मागणी वाढत आहे.
विशेष म्हणजे, नव्याने सुरू झालेल्या या कांदा मार्केटमध्ये अवघ्या एका महिन्यात सात बाजार भरले असून, सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. आता या मार्केटमधील कांदा थेट दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
विशेष म्हणजे, आतापर्यंत मंगळवार आणि गुरुवारी होणारी कांदा खरेदी आता रविवारी देखील सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहे.





