
नगर-दौंड रोडवर रविवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातात एका लष्करी जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजू मोहन भालसिंग (वय ४१), रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा हे नगर येथील एमआयआरसीमध्ये कार्यरत होते.
सुट्टी असल्याने ते मूळगावी गेले होते आणि रविवारी रात्री उशिरा केडगाव येथील निवासस्थानी परतत होते. पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास खंडाळा शिवारातील कार्ले वस्ती जवळ त्यांच्या मारुती इको कारची आणि समोरून येणाऱ्या भरधाव महिंद्रा पिकअपची जोरदार समोरासमोर धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि राजू भालसिंग यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि खडी क्रशरवरील कामगार घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना माहिती दिली.
अपघातात पिकअपमधील दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजू भालसिंग यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.





