
यंदाची आषाढी वारी अनेक कारणांनी खास ठरणार आहे. पण यंदा जे घडत आहे, ते वारकरी संप्रदायाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. कारण प्रथमच थेट लंडनहून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी एक जागतिक वारी निघाली आहे.
मंडळी, भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते लंडन ते पंढरपूर या पहिल्या ग्लोबल वारीचा शुभारंभ करण्यात आला आहे. लंडनच्या रॉयल विंडसर रेसकोर्सवरून या ऐतिहासिक दिंडीला प्रारंभ झाला असून तब्बल ५० दिवसांचा प्रवास करत ही वारी २५ जुलै रोजी, म्हणजेच आषाढी एकादशीला, पंढरपुरात दाखल होणार आहे.
या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे ही दिंडी तब्बल ११ देशांचा प्रवास करणार आहे. लंडनपासून सुरू झालेली ही वारी नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगेरी, रोमानिया आणि तुर्कीसह विविध देशांतून मार्गक्रमण करणार आहे. लंडनमध्ये उभारल्या जाणाऱ्या भव्य श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची माहिती जगभर पोहोचवणे, युरोपमधील नव्या पिढीला वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे आणि विश्वशांतीचा संदेश देणे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.
विशेष म्हणजे या ऐतिहासिक उपक्रमामागे अहिल्यानगरच्या भूमिपुत्राचा मोठा वाटा आहे. या वारीचे प्रमुख संयोजक डॉ. अनिल खेडकर हे मूळचे पाथर्डी तालुक्यातील वडगाव चिंचपूर येथील रहिवासी आहेत.
मंडळी, वारकरी संप्रदायाची परंपरा आता महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. विठ्ठल नामाचा गजर आता सातासमुद्रापार पोहोचला आहे.





