
अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अत्यंत विदारक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला हजारो टन कांदा अक्षरशः सडून गेला आहे. आता कांदा नाही, पैसा नाही आणि हातात उरलंय ते फक्त कर्जाचं ओझं.
मंडळी, गेल्या हंगामात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले होते. मात्र काढणीच्या काळातच बाजारभाव कोसळले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भविष्यात दर वाढतील, या आशेने लाखो रुपये खर्च करून कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला. चाळ बांधणी, मजुरी, वाहतूक, औषध फवारणी यासाठी मोठा खर्च करण्यात आला. अनेकांनी बँका आणि पतसंस्थांकडून कर्जही घेतले. शेतकऱ्यांना वाटलं काही महिने थांबलो तर चांगला भाव मिळेल आणि नुकसान भरून निघेल. पण घडलं मात्र उलटंच.
वाढते तापमान, बदलते हवामान आणि वाढलेली आर्द्रता यामुळे कांद्यावर काजळी, कूज आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. चाळीत साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला. अनेक ठिकाणी कांदा विक्रीयोग्यही राहिलेला नाही.
परिणामी, उत्पादन खर्च गेला, साठवणूक खर्च गेला आणि नफ्याची आशाही संपली. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांपुढे आता मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. मुलांचं शिक्षण, घरखर्च, पुढील हंगामासाठी बियाणं आणि खतांची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न अनेकांसमोर उभा आहे.





