
शेतकरी बांधव अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत होते, अखेर तो मान्सून तळकोकणात म्हणजेच दक्षिण कोकणात दाखल झाला आहे. पण पाऊस सुरू झाला म्हणून लगेच पेरणी केली तर नुकसान होऊ शकतं. कारण राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.
खरेतर, मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला तरी तो अजून राज्यभर सक्रिय झालेला नाही. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.
विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पाऊस होऊ शकतो. पण हा पाऊस व्यापक पेरणीसाठी पुरेसा नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. विदर्भ आणि खानदेशात तापमान ४० अंशांपेक्षा जास्त राहू शकते.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना सध्या पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली किंवा वीजवाहिनीजवळ थांबणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.





