Explained

Ahilyanagar Politics | नियोजन, ताकद, डावपेच अन् विखेंचा प्रभाव, सगळंच वाढलं…

सहकाराचा बालेकिल्ला कोणता, तर अहिल्यानगर… सहकारपंढरी असलेला नगर जिल्हा, राज्यातील सर्वात जास्त आमदार असलेला जिल्हा झालाय. नगरमध्ये थोडे न थिडके, तब्बल १९ आमदार आहेत. त्यातील आठरापैकी १३ आमदार हे निवडणुकीतून व पाच आमदार हे बिनविरोध निवडून आले होते. परंतु नुकत्याच झालेल्या १९ व्या आमदाराने अगदी काही तासांत आमदार होत, नवा ट्रेन्ड सेट केला. जे अगदी बारामतीच्या पवारांना, सातारा-सांगलीच्या पाटलांना, लातूरच्या देशमुखांनाही जमलं नाही, ते नगरच्या विखेंनी करुन दाखवलं. राहुरीचे पूर्वाश्रमीच्या पवारांचेच कार्यकर्ते, माजीमंत्री प्राजक्त तनपुरेंबाबतीत हे घडलंय. पक्षप्रवेश, त्यानंतर २४ तासांत उमेदवारी, त्यानंतर पुढच्या ९६ तासांत राजकीय डावपेच, आणि फक्त १२० तासांत आमदार… असा तनपुरेंचा प्रवास राहिलाय.

भाजपमध्ये येत विधान परिषदेचे आमदार झालेल्या, प्राजक्त तनपुरेंच्या या स्वप्नवत प्रवासानं सर्वांनाच आश्चर्यचकीत केलंय. विशेष म्हणजे विक्रमी वेळेत आपण विखेंच्या मास्टरस्ट्रोकनं कसं आमदार झालो, हे त्यांनी थेट भर स्टेजवर सांगूनही टाकलं. जिथं आमदार व्हायचं म्हटलं, तर पाच वर्षांची तपश्चर्या लागते. वर्षांतल्या ३६५ दिवसांचं समाजसेवंचं व्रत लागतं. २४ तास काम करण्याची हातोटी लागते. परंतु तिथं फक्त १२० तासांत आमदार करुन दाखविण्याची किमया भाजपनं केलीय. आता हे सांगूनही खरं वाटणारं नाहीए. नगरचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखेंनी अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवलीय. त्यामुळेच जशी तनपुरेंची राज्यभर चर्चा सुरु झालीय, तशीच चर्चा विखेंच्या रणनीतीचीही सुरु झालीय. नेमकं काय झालंय नगर जिल्ह्यात?

नगर जिल्ह्यात सध्या विधानसभेचे १२ आमदार आहेत. त्यात भाजपचे चार, अजित पवार गटाचे चार, शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि शरद पवार गट व काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे. विधान परिषदेचेही आता सात आमदार झाले आहेत. कर्जत-जामखेडमधून प्रा. राम शिंदे, श्रीगोंद्यातून अमित गोरखे, जामखेडमधून सुनील कर्जतकर, कोपरगावातून विवेक कोल्हे, पाथर्डीतून शिवाजीराव गर्जे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे असे पूर्वी सहा आमदार विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करत होते. परंतु नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या १७ जागांच्या निवडणुकीत राहुरीचे प्राजक्त तनपुरेही आमदार झाले. त्यामुळे विधान सभेचे १२ आणि विधान परिषदेचे सात असे, तब्बल १९ आमदार असलेला नगर जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा झालाय.

यापूर्वी नगर जिल्ह्याला एवढे आमदार कधीच लाभले नाहीत. नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुक्यानेही विक्रम केलाय. या तालुक्यात प्रा. राम शिंदे, रोहित पवार व सुनील कर्जतकर, असे तीन आमदार आहेत. त्याशिवाय पाथर्डीत मोनिका राजळे व शिवाजीराव गर्जे, कोपरगावमध्ये विवेक कोल्हे व आशुतोष काळे, संगमनेरमध्ये सत्यजित तांबे व अमोल खताळ, श्रीगोंद्यात विक्रमसिंह पाचपुते व अमित गोरखे, राहुरीत अक्षय कर्डिले व प्राजक्त तनपुरे, अशा तब्बल पाच तालुक्यांत, दोन-दोन आमदार आहेत. स्वातंत्र्यानंतर, हे सगळं पहिल्यांदाच घडलंय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेला नगर जिल्हा आता सर्वात जास्त आमदार असलेला जिल्हाही झालाय.

गेल्या आठवड्यात अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीत शरद पवार गटाचे माजीमंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करत बिनविरोध आमदार झाले. या निवडणुकीची सगळी जबाबदारी महायुतीने भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर दिली होती. महाविकास आघाडीची कमान काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हातात होती. थोरात व विखे हे दोन्ही दिग्गज नेते समजले जातात. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. महाविकास आघाडीनं जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे दिली होती. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत अपेक्षित होती.

भाजपकडून या जागेसाठी प्राजक्त तनपुरे हेच उमेदवार असतील, असं भाकीत अहिल्यानगर लाईव्ह २४ नं महिनाभरापूर्वीच केलं होतं. अपेक्षेप्रमाणे गेल्या शनिवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी, रविवारी भाजपनं त्यांची उमेदवारी जाहीर केली. २४ तासांत सोंगट्या फिरल्या. आता पुढच्या तीन दिवसांत म्हणजेच गुरुवारपर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपच्या हातात होते, फक्त ७२ तांस… याच ७२ तासांत या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार होतं.

भाजपनं प्राजक्त तनपुरेंची उमेदवारी जाहीर केली, त्यापूर्वीच लोणीच्या प्रवरा यंत्रणनेनं या निवडणुकीची तयारी सुरु केली होती. महिनाभरापूर्वी झालेल्या राहुरीच्या पोटनिवडणुकीत तनपुरेंना थांबविण्याची जबाबदारी, भाजपनं जशी विखेंच्या खांद्यावर दिली होती. तशीच तनपुरेंना आता आमदार करण्याची जबाबदारीही भाजपनं विखेंवरच दिली होती. विखेंची ही कसोटीच होती. राज्य निवडणूक आयोगानं विधान परिषदेची निवडणूक जाहीर करण्यापूर्वीच महाविकास आघाडीनंही या जागेसाठी तयारी सुरु केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नगरमध्ये बैठकही घेतली होती. शरद पवार गटाचेही मुंबईतून खलबते सुरु झाली होती.

विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यावर महायुती व महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच या निवडणुकीसाठी चार दिग्गजांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज भरले होते. या निवडणुकीची रंगत वाढली होती. परंतु पुढच्या ७२ तासांत प्रवरा यंत्रणा काय आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसलं. मच्छिंद्र धुमाळ, करण ससाणे, कमलेश गांधी, दत्ता पानसरे या दिग्गजांना शांत करणं सोप्पं काम नव्हतं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दवाखान्यात उपचार घेत असलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ. सुजय विखे पाटीलही या गंभीर परिस्थितीत भाजपला मदत करायला धावले. त्यांनी थेट नगर गाठून राजकीय डावपेच सुरु केले.

अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी शरद पवार गटानेही दोस्तीत कुस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही जागा मविआत काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचं जाहीर होऊनही, शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी अचानक राणी लंकेंच्या उमेदवारी जाहीर करुन टाकली. त्यामुळं काँग्रेसही गोंधळली. करण ससाणे व दीप चव्हाण हे काँग्रेसचे दोन उमेदवार असल्याचं सांगितलं गेलं. परंतु नंतर करण ससाणेंनी अपक्ष भरलेला अर्जच कायम राहिला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्जच भरला नाही.

शरद पवार गटाचे खा. निलेश लंके व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यात विसंवाद असल्याचं बोललं गेलं. शरद पवार गट व काँग्रेसने एकमेकांवर कुरघोड्या का केल्या, हा भाग निराळा मात्र थोरात-लंके यांच्यातील घोळामुळे मविआ मात्र तोंडावर आपटली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत मविआला अधिकृत उमेदवारच देता आला नाही.

गुरुवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी धुमाळ व गांधी या दोघांना माघार घेतली. करण ससाणेंसोबतही प्रवरा यंत्रणेनं पडद्याआडून संपर्क कायम ठेवला. ससाणेंनीही बिनशर्त माघार घेतली. आता राहिले फक्त श्रीगोंद्याचे अजित पवार गटाचे नेते दत्ता पानसरे. दत्ता पानसरेंची मनधरणी विखेंनी शेवटपर्यंत सुरु ठेवली. आ. संग्राम जगताप, आ. अक्षय कर्डिलेंना सोबत घेत पानसरेंना समजविण्याचा प्रयत्न सुरु झाला. भाजपच्या वरिष्ठांशी पानसरेंचे बोलणे करुन दिले गेले. अखेर चार चाललेली ही मनधरणी यशस्वी झाली आणि पानसरेंनी माघार घेतली. उमेदवारी जाहीर झाल्यापासून, पुढच्या पाच दिवसांत प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार झाले. फक्त १२० तासांत तनपुरेंचं आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

या सगळ्या घडामोडीत जिल्ह्यात भाजपची व पर्यायानं विखेंची संघटनात्मक ताकद अनुभवली. विखेंचा राजकीय प्रभाव पुन्हा एकदा सगळ्यांनी पाहिला. विखेंचं १२० तासांतलं हे सगळं नियोजन पाहून नूतन आ. प्राजक्त तनपुरेही भारावले. राहुरीतील सत्कार समारंभात त्यांनी विखेंचा प्रभाव बोलून दाखवला.

या कार्यक्रमात पालकमंत्री विखेंना उद्देशून तनपुरे म्हणाले, “आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो. आजवर दूरून बघायचो. मात्र गेल्या पाच दिवसांत आपल्या कार्यशैलीचा अनुभव घेतला. शनिवारी माझा पक्षात प्रवेश झाला. रविवारी उमेदवारी जाहीर झाली. आणि गुरूवारी मी आमदार झालो. एवढ्या झटपट आमदार होता येतं का? पण विखेंनी ते करुन दाखवलं. राहुरीकरांनी तुमच्या झटपट कार्यशैलीचा अनुभव घेतला.

मी सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की, तिकीट मिळण्यापासून ते अर्ज भरण्याची प्रक्रीया असो की, अर्ज काढण्याचा दिवस असो, तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात सिंहाचा वाटा कुणी उचचला असेल, तर तो विखे पाटील साहेबांनी… मी यापूर्वी पाच वर्ष विधानसभेवर होतो. आता मी पुन्हा आलोय. विधानसभेत नाही पण विधान परिषदेत आलो. ही संधी आपण मला दिलेली आहे. मला खात्री आहे की, राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघ तर आहेच पण जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडण्याची संधी आपण मला विखे साहेबांनी दिली. या संधीच सोन केल्याशिवाय राहणार नाही,” असं म्हणत तनपुरेंनी विखेंचे जाहीर आभार मानले.

विखेंनी राबविलेला १२० तासांच्या आमदारकीचा फंडा सध्या राज्यात चर्चेत आलाय. जे कुठंच होत नाही, ते नगरमध्ये घडलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button