
अहिल्यानगरमधील मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना.. तुमचं नाव मतदार यादीत कायम ठेवायचं असेल, तर हे काम तात्काळ करा, अन्यथा तुमचं नाव थेट यादीतून वगळलं जाऊ शकतं. मंडळी, पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्रातही एसआयआर म्हणजेच मतदार यादी पडताळणी कार्यक्रम लागू होण्याची शक्यता आहे. त्याआधी सध्या मतदारांचे ‘मॅपिंग’ करण्याचे काम जोरात सुरू आहे.
अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बीएलओ अधिकारी घराघरात जाऊन मतदारांची माहिती तपासत आहेत. मात्र, अनेक नागरिक या मोहिमेला प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे, त्यामुळे ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मतदारांचे मॅपिंग होणार नाही, त्यांचे नाव मतदार यादीतून काढले जाऊ शकते. किंवा पुढे एसआयआर प्रक्रियेत त्यांना सुनावणीला सामोरं जावं लागू शकतं. या पडताळणीसाठी २००२ च्या मतदार यादीचा आधार घेतला जात आहे.
जर त्या यादीत नाव नसेल, तर आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाच्या आधारे पडताळणी केली जाणार आहे. पण जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर पुढे तुमचं नाव पुन्हा यादीत आणण्यासाठी किचकट प्रक्रिया करावी लागणार आहे. म्हणूनच एसआयआर लागू होण्यापूर्वीच सर्व मतदारांनी मॅपिंग करून घ्यावं, अन्यथा अडचणीत यावं लागू शकतं असं आवाहन नोंदणी अधिकारी सुधीर पाटील यांनी केलंय.





