
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठा कहर केला. कडगाव, मिरी, शंकरवाडी आणि शिराळ परिसरात घरांचे, शेतीचे आणि वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले.
कडगाव येथील शेतकरी विलास किसन शिरसाट यांच्या घरावर रात्री साडेनऊच्या सुमारास वादळाचा जोरदार फटका बसला. कुटुंबीय पडवीत झोपलेले असतानाच घरावरील पत्रे उडून गेली आणि भिंत थेट त्यांच्यावर कोसळली. या भीषण दुर्घटनेत समाबाई विलास शिरसाट (वय 75) यांच्या डोक्यावर लोखंडी पत्रा पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना अहिल्यानगरला हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या दुर्घटनेत विलास शिरसाट, सागर शिरसाट, विराज शिरसाट आणि अलका शिरसाट हेही जखमी झाले आहेत. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले, तारा तुटल्या आणि गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. शिराळ परिसरात शेतकऱ्यांच्या सोलर पंपांचेही मोठे नुकसान झाले आहे.





