Latest

अहिल्यानगरमध्ये पाणीटंचाईची भीषणता ! जिल्हाभरात दररोज १२५ टँकर, दक्षिण भाग पर्जन्यछायेखाली..

अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उन्हाचा कडाका वाढत असताना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मंडळी, पाऊस लांबल्याने आणि वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील लहान व मध्यम तलाव कोरडे पडले आहेत.

विहिरी, कूपनलिका आणि इतर जलस्रोत आटू लागल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. सध्या जिल्ह्यातील १३९ गावे आणि ७३८ वाड्यावस्त्यांमधील तब्बल २ लाख ३५ हजारांहून अधिक लोकांना दररोज १२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्याचा दक्षिण भाग हा पर्जन्यछायेखाली असल्याने तेथे परिस्थिती अधिक गंभीर आहे. पारनेर, पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि नगर तालुक्यांमध्ये टँकरची मागणी सर्वाधिक वाढली आहे.

दुसरीकडे, जिल्ह्याच्या उत्तर भागातील अकोले आणि संगमनेर तालुक्यातील डोंगराळ भागालाही पाणीटंचाईचा फटका बसत आहे. संगमनेर तालुक्यातील २८ गावे आणि ७१ वाड्यावस्त्यांमधील जवळपास ४० हजार लोकांना २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय.

दरम्यान, टंचाईग्रस्त भागांमध्ये तातडीने मदत पोहोचावी यासाठी प्रशासनाने प्रांताधिकाऱ्यांना टँकर मंजुरीचे अधिकार दिले आहेत. मंडळी, अद्यापही पाऊस नसल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाण्याची नासाडी टाळणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा येत्या काही आठवड्यांत परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते हे नक्की ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button